स्मशानभूमी सौंदर्यीकरणापासून दूरच
By admin | Published: March 29, 2015 02:12 AM2015-03-29T02:12:08+5:302015-03-29T02:12:08+5:30
शहरातील स्मशानभूमीच्या तुलनेत ग्रामीण भागातील स्मशानभूमीची दुरवस्था कायम आहे. यासाठी शासनाने निधी देण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे.
सेलू : शहरातील स्मशानभूमीच्या तुलनेत ग्रामीण भागातील स्मशानभूमीची दुरवस्था कायम आहे. यासाठी शासनाने निधी देण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे. सोयी सुविधा नसल्याने अंत्यविधीसाठी आलेल्या नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागतो.
तालुक्यातील बहुतांश स्मशानभूमी नदीच्या व नाल्याच्या काठावर आहेत. काही ठिकाणी शेतात अंत्यविधी कार्यक्रम पार पाडले जातात. शासनाने गत १० वर्षांत स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत अंत्यविधी पार पाडण्याकरिता शेडची व्यवस्था केली. पण यातील बहुतेक शेडचे बांधकाम निकृष्ठ दर्जाचे झाल्याने त्यांनी दुरावस्थेकडे वाटचाल सुरू आहे. सौंदर्यीकरणासाठी शासनाचा निधी मिळत नसल्याने मृतावर अंतिम संस्कार करतेवेळी उपस्थित राहणाऱ्या चाहत्यांना सावली व बसण्याची व्यवस्था नसल्याने त्रास सहन करावा लागत आहे.
नदी व नाल्याच्या काठावर गावा शेजारी असलेल्या स्मशानभूमीला गोदरीमुक्त करण्यात ग्रामपंचायत प्रशासनाला अपयश येत असून कुठेही तारेचे कुंपण आढळून येत नाही. आजूबाजूला झाडे नसल्याने उन्हाळ्याच्या दिवसात साावलीचा आसरा मिळणेही कठीण जाते, तर पावसाळ्याच्या दिवसात प्रेत जाळताना अदचणी येतात.
ग्रामीण भागातील स्मशानभूमी सोयी-सुविधायुक्त व्हावी, सौंदर्यीकरण केल्या जावे, किमान पाण्याची तरी सोय करावी, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करतात. परंतु प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे अंत्यसंस्कारासाठी आलेले नागरिक नेहमीच संताप व्यक्त करीत असतात. (तालुका प्रतिनिधी)