सिंदी (रेल्वे)चा तान्हा पोळा शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2018 11:47 PM2018-09-09T23:47:50+5:302018-09-09T23:49:48+5:30
विदर्भात नागपूरची मारबत, पांढुर्णाची गोटमार आणि सिंदी (रेल्वे) चा साजरा होणारा बाल गोपालांचा लाकडी नंदी पोळा लौकिक मिळवून आहे. ऐतिहासिक परंपरा असलेला तान्हा पोळा १४० वर्षाच्यावर जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सिंदी (रेल्वे) : विदर्भात नागपूरची मारबत, पांढुर्णाची गोटमार आणि सिंदी (रेल्वे) चा साजरा होणारा बाल गोपालांचा लाकडी नंदी पोळा लौकिक मिळवून आहे. ऐतिहासिक परंपरा असलेला तान्हा पोळा १४० वर्षाच्यावर जात आहे. पिढया न पिढ्या हा पोळा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केल्या जात आहे. सिंदी शहराला ‘पोळा सिटी’ अशी नवी ओळख निर्माण होत आहे. याची प्रचिती म्हणून बाजारचौकात नंदीचा पुतळा यावर्षी बसविण्यात आला आहे.
नगर पालिकेच्यावतीने आयोजित या पोळ्यात पोलीस प्रशासन, महावितरण कर्मचाऱ्यांकडून चोख व्यवस्था ठेवली जाते. हा ऐतिहासिक पोळा पाहण्यासाठी सिंदीवासीय सर्वांना आग्रहाचे निमंत्रण देतात. या दिवशी गावात प्रत्येक घरी पाहुणा हा सोहळा पाहण्यासाठी हजर असतो.
सिंदी शहराला येते जत्रेचे स्वरूप
पोळा सणाची एक महिन्यांपासून आतुरतेने सिंदीवासी वाट पाहतात. तान्हा पोळ्यासाठी ४ ते ५ दिवसांपासून सिंदी गाव सजविण्यात येते. सायंकाळी ४० ते ५० हजार लोकांच्या उपस्थितीत पोळा सण साजरा केला जातो. एक नंदीवाला व झाँकीवाल्याचा खर्च १ ते २ लाखांपर्यंत असतो. ढोलताशांच्या निनादात ट्रॅक्टर ट्रॉलीवर विद्युत रोषणाई करून नंदी बैल ऐटीत बाजार चौकात येतात.
सुरक्षेकरिता पोलिसांसह गृहरक्षकही तैनात
सिंदी तान्हा पोळ्याच्या सुरक्षिततेसाठी उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेशकुमार कोल्हे यांच्या नेतृत्वात ३ पोलीस निरीक्षक, १२ पोलीस उपनिरीक्षक, १२५ पोलीस शिपाई, एलसीबीची टीम, गृहरक्षक, कॅमेराद्वारे शुटींग करण्यात येणार आहे. अनुचित घटना टाळण्याकरिता या प्रकारचा बंदोबस्त राहणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक विलास काळे यांनी दिली. हा पोळा पाहण्यासाठी विदर्भ व मध्यप्रदेशातूनही मोठ्या संख्येने नागरिक येतात. रात्री उशीरापर्यंत हा सोहळा चालतो.