सेवाग्राम विकास आराखड्यातील विकासकामे आकर्षणाचे केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2020 06:00 AM2020-01-01T06:00:00+5:302020-01-01T06:00:11+5:30
सेवाग्राम येथील अण्णासागर तलाव येथे महात्मा गांधी व विनोबा भावे यांचे भव्य स्वरुपातील स्क्रॅप स्कल्पचर उभारण्यात येणार आहे. हे शिल्पे ही धातूच्या टाकाऊ वस्तुपासून तयार करण्यात येणार असून त्यांची उंची साधारणपणे ३५ ते ४० फुट असणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त सेवाग्राम विकास आराखड्यांतर्गत विविध विकास कामे हाती घेण्यात आली आहे. बहूतांश कामे पुर्णत्वास गेली असून काही कामे प्रगतीपथावर आहेत. त्यामुळे सेवाग्राम विकास आराखड्यांतर्गत होणारी विकासकामे ही पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे, असा विश्वास प्रभारी जिल्हाधिकारी अशोक लटारे यांनी व्यक्त केला.
सेवाग्राम येथील अण्णासागर तलाव येथे महात्मा गांधी व विनोबा भावे यांचे भव्य स्वरुपातील स्क्रॅप स्कल्पचर उभारण्यात येणार आहे. हे शिल्पे ही धातूच्या टाकाऊ वस्तुपासून तयार करण्यात येणार असून त्यांची उंची साधारणपणे ३५ ते ४० फुट असणार आहे. हे स्क्रॅप स्कल्पचर तयार करण्यासाठी जे. जे. स्कूल ऑफ आर्टचे तीन प्राध्यापकाच्या मार्गदर्शनाखाली २५ विद्यार्थी व पाच तंत्र सहाय्यक शिल्प साकारण्याची कामे दिवस रात्र करीत आहे. या कामाची जिल्हाधिकारी अशोक लटारे व अन्य मान्यवरांनी पाहणी करुन समाधान व्यक्त केले.
सेवाग्राम विकास आराखड्यांतर्गत शहरात सुरु असलेली विविध कामाची पाहणी करतांना जिल्हाधिकारी यांच्या समवेत महाराष्ट्र शासनाचे कला संचालक राजीव मिश्रा, जे.जे. स्कूल आॅफ आर्ट मुबंईचे अधिष्ठाता विश्वनाथ साबळे, उपकला संचालक विनोद दांडगे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता गजानन टाके, उपविभागीय अभियंता संजय मंत्री, जिल्हा नियोजन अधिकारी अरविंद टेंभुर्णे, मे. अडारकर असोशिएटसचे प्रतिनिधी वसिम खान, जे.जे. स्कूल आर्ट मुबंईचे प्रा. शशिकांत काकडे, प्रा. विजय सपकाळ, प्रा. विजय बोंदरे, प्रा. यशवंत भावसार व विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी वर्धा शहरातील गांधी चौक, आंबेडकर चौक, बजाज चौक येथे साकारण्यात आलेली म्युरल, भिंत्तीचित्र व सुरक्षिततेबाबत चर्चा करुन कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणेला दिले. मान्यवरांनी सेवाग्राम येथील चरखागृहास भेट देऊन प्रस्तावित चरखा म्युझियम कामाची पाहणी केली. प्राचीन काळापासून आधुनिक काळापर्यंत चरख्याचे महत्व अधोरेखित करणारे आणि महात्मा गांधींनी स्वराज्य व स्वावलंबनासाठी वापरलेल्या चरख्याचे महत्व दृकश्राव्य माध्यमातून मांडण्यात येत आहे. त्यामुळे पर्यटकांना मोठी संधी आहेत.