सत्तेचा दुरूपयोग केंद्र सरकार करीत आहे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2018 10:25 PM2018-11-08T22:25:21+5:302018-11-08T22:25:33+5:30
आपल्या देशात कष्ट करणारे कायम दुर्लक्षित राहिले आणि नुसत्या गोष्टी सांगणारे वंदनीय झाले. पण ज्या पद्धतीने रिकामं पोत उभं रहात नाही तसेच पोकळ कृतीचा आधार नसलेला विचार समाजात खूप काळ टिकू शकत नाही. वर्तमान सत्तेत असलेले लोक केवळ बोलघेवडे लोक आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : आपल्या देशात कष्ट करणारे कायम दुर्लक्षित राहिले आणि नुसत्या गोष्टी सांगणारे वंदनीय झाले. पण ज्या पद्धतीने रिकामं पोत उभं रहात नाही तसेच पोकळ कृतीचा आधार नसलेला विचार समाजात खूप काळ टिकू शकत नाही. वर्तमान सत्तेत असलेले लोक केवळ बोलघेवडे लोक आहेत. संघाचे लोक व्रत घेवून खोटं बोलणारे आहेत. यांना विचारांच्यानुसार कृती केली पाहिजे. यापेक्षा श्रम करणाऱ्यांना सतत समाजाला भ्रमात ठेवण्याचे काम करतात. राज्यसतेचा सर्वात जास्त दुरूपयोग व लोकशाहीच्या संस्था निर्जीव करण्याचा प्रयत्न वर्तमान केंद्र सरकार करीत आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारक अनंत अमदाबादकर यांनी केले. किसान अधिकार अभियानच्या बलिमहोत्सवात ते बोलत होते.
किसान अधिकार अभियान मागील दहा वर्षापासून दिवाळीच्या दिवशी वर्धा शहरात बलिमहोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करीत आहेत. यावर्षी जिल्ह्यातील व विदर्भातील शेती प्रश्नांची चर्चा करण्यात आली. यावेळी मुख्य अतिथी म्हणून ज्येष्ठ विचारवंत अनंत अमदाबादकर, जागतिक बँकेचे सल्लागार श्रीकांत बारहाते, मुख्य प्रेरक अविनाश काकडे, अभ्युदय मेघे यांची प्रमुख उपस्थिती होती.
सुरूवातीला सर्व देशातील आत्महत्याग्रस्त शेतकरी, सीमेवरील जवान-सैनिक, गोरक्षकांच्या हल्ल्यातील शहीद निष्पाप लोक, बलात्काराने पिडीत स्त्री-पुरूषांना यावेळी आदरांजली देण्यात आली. परिवर्तनाच्या गीतांचे सादरीकरण यावेळी संजय भगत, सुनिल ढाले, भारत कोकावार, प्रशांत गुजर, गजानन नेहारे, मंगेश शेंडे, किरण राऊत, गजेंद्र सुरकार, रिना सोमनाथे यांनी सादर केले.
बलिमहोत्सव या कार्यक्रमाची भूमिका प्रा. नूतन माळवी यांनी मांडली. बलिराजा व त्यांची परंपरा याबाबत माहिती दिली. किसान अधिकार अभियानचे मुख्य प्रेरक अविनाश काकडे यांनी संघटनेच्या उद्दिष्टांची माहिती दिली. येत्या संकटकाळात किसान अधिकारी अभियानच्या भूमिकेला महत्व असणार आहे. सर्वत्र असत्याचा व भ्रमाचे वातावरण पसरलेले असताना सत्याची साधना करणाऱ्यांचे महत्व विशेष आहे, असे प्रतिपादन यावेळी त्यांनी केले. यावेळी श्रीकांत बारहाते यांनी सरकारची धोरण भूमिका जेव्हा लोकशाही विरोधी होते तेव्हा ती लोकशाही संस्थांना संपवण्याचा, अडचणीत आणण्याचा प्रयत्न करते. याचा अनुभव देशातील लोक वर्तमान मोदी शासनाच्या माध्यमातून घेत आहे, असे मत व्यक्त केले.
या महोत्सवात शेतकरी-शेतमजुरांच्या आंदोलनाची दिशा यावर खुली चर्चा झाली. त्यात जिल्हाध्यक्ष सुदाम पवार, वारलु मिलमिले, भाऊराव काकडे, गजानन इखार, प्रा. जनार्दन देवतळे, डॉ. सुभाष खंडारे, सुरेश बोरकर, नितिन झाडे, प्रफुल कुकडे, नितीन पाटील, किशोर जगताप, प्रकाश कांबळे, विठ्ठल झाडे, अनंत ठाकरे, भरत कोकावार, जगदीश चरडे, प्रल्हाद भलावी या प्रमुख कार्यकर्त्यांनी मत मांडणी केली.
यावेळी भारताचे संविधान प्रत स्मरण करण्यासाठी ठेवण्यात आली होती. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी झाले. या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी गजानन नेहारे, मंगेश शेंडे, मयूर राऊत, दिनेश काकडे, प्रमुख कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.