सीईओंनी घेतला ग्रामसेवकांचा आढावा
By admin | Published: July 27, 2016 12:04 AM2016-07-27T00:04:09+5:302016-07-27T00:04:09+5:30
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नयना गुंडे यांनी स्वच्छ भारत मिशनच्या यशस्वीतेकरिता
स्वच्छ भारत मिशन : आॅक्टोबर अखेरपर्यंत देवळीत हागणदारीमुक्तीच्या सूचना
देवळी : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नयना गुंडे यांनी स्वच्छ भारत मिशनच्या यशस्वीतेकरिता देवळी पंचायत समितीमध्ये ग्रामसेवकांची मंगळवारी आढावा सभा घेतली. यावेळी त्यांनी देवळी तालुका आॅक्टोबर अखेरपर्यंत १०० टक्के हागणदारीमुक्त करण्याचा सूचना त्यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या. गावाच्या विकासाकरिता सर्वप्रथम गाव हागणदारीमुक्त करणे गरजेचे असून या कामास प्राधान्य देण्यात यावे, असे त्यांनी सांगितले.
आढावा सभेला पाणी पुरवठा विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी शालीक मेश्राम, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे, उपसभापती गुलाब डफरे, जि.प. सदस्य उज्ज्वला राऊत, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक अमित खाडे, संवाद तज्ज्ञ विनोद खोब्रागडे आदी उपस्थित होते.
मुख्य कार्यकारी अधिकारी नयना गुंडे यांनी स्वच्छ भारत मिशन बाबत ग्रामपंचायत निहाय आढावा घेतला. तसेच देवळी तालुका आॅक्टोबर २०१६ अखेरपर्यंत हागणदारीमुक्त करावयाचा असून त्यादृष्टीने ग्रामसेवकांनी नियोजन करावे. अनेक ग्रामपंचायतीमध्ये शौचालय बांधकाम झाले आहेत; मात्र रिपोर्टींग केल्या जात नसल्याने जिल्ह्याची प्रगती समाधानकारक दिसत नाही. तेव्हा लाभार्थ्यांचे शौचालय बांधकाम होताच त्वरित स्वच्छ भारत मिशन कक्षास कळवावे. लाभार्थ्यांस वेळेवर प्रोत्साहनपर बक्षीसाची रक्कम देण्यात यावी, अशा सूचना त्यांनी केल्या. शिवाय ग्रामसेवकांच्या समस्याही जाणून घेतल्या.
देवळी तालुक्यात सन २०१६-१७ मध्ये ७,४५६ शौचालयाचे उद्दिष्ट असून जुलैपर्यंत १,४१४ शौचालयाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. ३२७ शौचालयाचे बांधकाम सुरू असून ६३ ग्रामपंचायती पैकी १६ ग्रा.पं. सर्व्हेनुसार हागणदारीमुक्त झाल्याची माहिती गटविकास अधिकारी शिंदे यांनी दिली.(प्रतिनिधी)