पुलगावात ‘चेन स्नॅचिंग’; पोलिसांकडून ठिकठिकाणी नाकाबंदी, चोरटे शोधण्याचे मोठे आव्हान
By चैतन्य जोशी | Published: October 3, 2022 06:19 PM2022-10-03T18:19:29+5:302022-10-03T18:20:35+5:30
पोलिसांकडून अनेकदा मौल्यवान दागिने परिधान करुन घराबाहेर न निघण्याचे आवाहन केले जाते. मात्र, नागरिकांचे याला पाहिजे तेवढे सहकार्य मिळत नसल्याने अशा घटना घडताना दिसून येत आहेत.
वर्धा - शहरासह जिल्ह्यात सध्या एकापाठोपाठ चोरीच्या घटना घडत आहे. तीन दिवसांपूर्वी वर्धा शहरातील धुनिवाले मठ परिसरात चेन स्नॅचिंगची घटना घडली. पोलीस आरोपीच्या शोधात असतानाच २ रोजी पुलगाव येथील हरिराम नगर परिसरात रात्री ९.१५ मिनिटांच्या सुमारास घडली. या घटनेने मात्र महिलावर्गांत दहशतीचे वातावरण निर्माण झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. शहरासह जिल्ह्यात सध्या सोनसाखळी चोरट्यांनी हैदोस घातला आहे.
पोलिसांकडून अनेकदा मौल्यवान दागिने परिधान करुन घराबाहेर न निघण्याचे आवाहन केले जाते. मात्र, नागरिकांचे याला पाहिजे तेवढे सहकार्य मिळत नसल्याने अशा घटना घडताना दिसून येत आहेत. अशीच एक घटना पुलगाव शहरात घडली. राखी मंडले ही महिला घरी जात असताना दुचाकीवर आलेल्या दोन चोरट्यांनी रस्ता सामसुम असल्याचा फायदा घेऊन महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी जबरीने हिसकावून पळ काढला. या घटनेची तक्रार राखी मंडले यांनी पुलगाव पोलिसात दिली. पोलिसांनी दोन्ही चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली.
नाकाबंदी अन् वाहनांची तपासणी
पुलगावात घडलेल्या घटनेने शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. असे असताना पोलिसांसमोर चोरट्यांना पकडण्यासाठी मोठे आव्हान आहे. पोलिसांनी शहरातील मुख्य चौकात तसेच इतर चौकांमध्ये नाकाबंदी करुन पोलीस तैनात केले आहेत. ये जा करणाऱ्या वाहनांची तपासणी केली जात आहे.
आरोपी ‘सीसीटीव्ही’त कैद
मोपेड दुचाकीवर आलेल्या दोघांचेही चित्रिकरण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. त्यामुळे पोलिसांकडून आरोपी चोरट्यांचा युद्धस्तरावर शोध घेतला जातो आहे. लवकरच आरोपी पोलिसांच्या ताब्यात येणार असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी गोकुळसिंह पाटील यांनी दिली.
गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गाठले पुलगाव
घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय गायकवाड हे कर्मचाऱ्यांसह पुलगाव येथे पोहचले. त्यांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली. सीसीटीव्ही तपासणी करुन तशा सूचना कर्मचाऱ्याना केल्या.