कुख्यात आरोपींना ठोकल्या बेड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2018 12:13 AM2018-12-22T00:13:23+5:302018-12-22T00:13:55+5:30
तडीपारीच्या कारवाईला सामोरे जाण्यासह हत्या, मारहाणसह बंदुकीच्या धाकावर रोकड पळविणे, दारूविक्री आदी स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या इतवारा येथील रहिवासी असलेल्या राकेश मन्ना पांडे (२७) व इमरान उर्फ इमु शेख जमीर (२८) या दोघांना अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : तडीपारीच्या कारवाईला सामोरे जाण्यासह हत्या, मारहाणसह बंदुकीच्या धाकावर रोकड पळविणे, दारूविक्री आदी स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या इतवारा येथील रहिवासी असलेल्या राकेश मन्ना पांडे (२७) व इमरान उर्फ इमु शेख जमीर (२८) या दोघांना अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. सदर दोन्ही आरोपींनी संगणमत करून येथील सेवाग्राम रेल्वे स्थानकाच्या जुन्या मार्गावर दुचाकीने जाणाऱ्या दोघांना अडवून त्यांच्याजवळील रोख, मोबाईल व सोन्याची अंगठी बंदुकीच्या धाकावर पळवून नेल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी दुचाकीसह एक बंदुक व दोन गोळ्या तसेच दोन मोबाईल जप्त केले आहे. या दोन्ही आरोपींना केळापूर शिवारातून ताब्यात घेत अटक करण्यात आली आहे.
प्राप्त माहितीनुसार, स्थानिक गजानननगर येथील सुधीर अजाब कोवार व त्यांचा भाचा दुचाकीने इतवारा भागातील जुन्या सेवाग्राम स्टेशन रोडने जात असता दुचाकीने मागाहून आलेल्या दोघांनी त्यांना वाटेत अडविले. बंदुकीच धाकावर त्यांच्याकडून सोन्याची अंगठी, दोन मोबाईलसह ४०० रुपये हिस्कावून पोबारा केला. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात तक्रारीवरून गुन्हा दाखल होताच या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वळता करण्यात आला. पोलिसांनी गोपनिय माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेतला असता या दोन्ही कुख्यात गुन्हेगारांची माहिती मिळाली. माहितीच्या आधारे ओळख लपवून वर्धा शहरात राहणाºया आरोपी राकेश पांडे व इमरान शेख जमीर याला केळापूर शिवारातून ताब्यात घेतले. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक निलेश ब्राह्मणे यांच्या निर्देशानुसार पोलीस उपनिरीक्षक पंकज पवार, महेंद्र इंगळे, अशोक साबळे, प्रदीप देशमुख, निरंजन वरभे, दिनेश कांबळे, राजेंद्र ठाकुर, संजय ठोमरे, रितेश शर्मा, प्रदीप वाघ, राकेश आष्टनकर, रामकृष्ण इंगळे, विकास अवचट, विलास लोहकरे, भुषण पुरी, आत्माराम भोयर, संघसेन कांबळे, दिनेश बोधनकर, कुलदीप टांकसाळे, गणेश येवले यांनी केली.
ओळख बदलवून राहात होता वर्धेत
अटकेत असलेल्या आरोपी राकेश पांडे याच्याविरुद्ध भादंविच्या ३०७, ३०२, ३९४, ३९२ या कलमांसह दारूविक्री व तस्करी प्रकरणी तसेच बेकायदेशीर हत्यार बाळगण्या प्रकरणी वर्धा शहर व रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. तर इमरान शेख जमीर याच्याविरुद्ध मारहाण करणे, ३९२,३९४, ३२४ या कलमांसह दारूविक्री व तस्करी प्रकरणी तसेच बेकायदेशीर हत्यार बाळगण्या प्रकरणी वर्धा शहर व रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. इतकेच नव्हे तर राकेश पांडे याच्याविरुद्ध पोलिसांनी यापूर्वी तडीपारीची कारवाई केली होती. हे दोन्ही आरोपी आपली ओळख लपवून वर्धा शहरात राहत असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात पुढे आले आहे.