होळीच्या पूर्वसंध्येला एकावर चाकूहल्ला
By admin | Published: March 13, 2017 12:38 AM2017-03-13T00:38:21+5:302017-03-13T00:38:21+5:30
होळीच्या पूर्वसंध्येला इतवारा भागातील दोन युवकांनी तेथीलच रहिवाशी असलेल्या विहार बंडू पाटील याच्यावर चाकू हल्ला
दोघांना अटक : इतवारा परिसरातील घटना
वर्धा : होळीच्या पूर्वसंध्येला इतवारा भागातील दोन युवकांनी तेथीलच रहिवाशी असलेल्या विहार बंडू पाटील याच्यावर चाकू हल्ला करुन गंभीर जखमी केले. ही घटना शनिवारी सायंकाळी इतवारा भागातील मच्छी बाजार परिसरात घडली. या प्रकरणी रात्री उशीरा पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. सदर प्रकरणी विक्की बाबुराव सोळंकी व शुभम खत्री दोन्ही रा. इतवारा बाजार परिसर यांना पोलिसांनी अटक केली आहे.
पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विक्की सोळंकी व शुभम खत्री हे दोघे विहार याच्या मामेभावाला शिवीगाळ करीत होते. या दोघांना शिवीगाळ का करता अशी विचारणा करण्यासाठी विहार गेला होता. दरम्यान संतापलेल्या विक्की व शुभम या दोघांनी जवळ असलेल्या चाकूने विहारवर हल्ला चढविला. आरोपींनी चाकूने विहारच्या मानेवर, पोटावर व पाठीवर मारहाण केली. यात गंभीर जखमी झाल्याने विहारला परिसरातील नागरिकांच्या मदतीने सेवाग्राम येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. सदर घटनेची विहार पाटील याने शहर पोलिसात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीवरून शहर पोलिसांनी विक्की सोळंकी व शुभम खत्री या दोघांविरूद्ध भादंविच्या कलम ३०७, ३४ अन्वये गुन्हा दाखल करून दोघांनाही अटक केली आहे.
रविवारी सकाळी शहर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक निशिकांत रामटेके यांनी आपल्या चमुसह घटनास्थळ गाठून घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली. घटनास्थळावरून रक्तमिश्रीत माती व साध्या मातीचे नमुने घेण्यात आले आहे. गोळा केलेले नमूने प्रयोगशाळेत तपासणीकरिता पाठविण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.(शहर प्रतिनिधी)