दारूविक्रेत्यांचा दारूबंदी महिला मंडळाच्या अध्यक्षावर चाकूहल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2019 09:16 PM2019-08-06T21:16:53+5:302019-08-06T21:17:42+5:30
दारूबंदी महिला मंडळाच्या अध्यक्षावर दारूविक्रेत्यांनी धारदार शस्त्राने हल्ला करीत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. सोमवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास शहरात डांगरी वॉर्डात ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणघाट : दारूबंदी महिला मंडळाच्या अध्यक्षावर दारूविक्रेत्यांनी धारदार शस्त्राने हल्ला करीत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. सोमवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास शहरात डांगरी वॉर्डात ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले.
पूजा प्रवीण काळे (३०) असे दारूबंदी महिला मंडळाच्या जखमी अध्यक्ष महिलेचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, पूजा प्रवीण काळे या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जिल्हा दारूबंदी महिला मंडळाच्या अध्यक्ष आहेत. दारूबंदी महिला मंडळाची बैठक घेऊन त्या आपल्या डांगरी वॉर्डातील निवासस्थानाकडे येत होत्या. दरम्यान, घराजवळ चार दारूविक्रेत्यांनी त्यांना अडविले व मारहाण सुरू केली. यातील एका दारूविक्रेत्याने पूजा काळे यांच्या छातीवर चाकूने वार केले. यावेळी आपला नातू का रडत आहे व कशाची गर्दी जमली आहे, हे पाहण्यासाठी पूजाचे वडील रमेश लहानूजी जुमडे हे गेले असता मुलीला चाकूने मारत असल्याचे दिसून आले. दारूविक्रेत्यांचा प्रतिकार करीत मुलीची सुटका केली आणि थेट पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी पूजा काळे यांना उपचारासाठी हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. गंभीर जखमी असल्याने तिला पुढील उपचाराकरिता सेवाग्राम रुग्णालयात हलविण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी भादंवि कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी वेगाने तपासकार्य करून गणेश भांगे (३२), गोलू पांडे (३४), संदीप थुटरकर ३८ सर्व रा. डांगरी वॉर्ड, हिंगणघाट यांना मंगळवारी अटक केली. घेतले.
तत्कालीन पोलीस अधीक्षकांनी दिले पाठबळ
मागील कित्येक वर्षांपासून पूजा काळे या हिंगणघाट शहरात दारूबंदीसाठी काम करीत आहेत. अनेक महिलांना एकत्रित करून त्यांनी दारूबंदी महिला मंडळाची डांगरी वॉर्डात स्थापना केली. पूजा यांच्यासह सहकारी सदस्य महिलांनी डांगरी वॉर्डातून दारू हद्दपार केली. तत्कालीन पोलीस अधीक्षक निर्मलादेवी यांनीदेखील दारूबंदी महिला मंडळाला मोठे पाठबळ दिले होते.
यापूर्वीही काळेंवर अनेकवेळा हल्ला
मध्यंतरी हिंगणघाट शहरात अनेक ठिकाणी दारू सुरू होती; मात्र केवळ डांगरी वॉर्डातच दारूविक्री बंद असल्याने चिडलेल्या दारूविक्रेत्यांनी दारूबंदी महिला मंडळाविरोधात पोलिसांत खोट्या तक्रारी करणे सुरू केले. यातही कुणी जुमानत नसल्याचे निदर्शनास आल्याने काळे यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. यापूर्वीही पूजा काळे यांच्यावर जीवघेणा हल्ल्याच्या अनेक घटना घडल्या. त्यामुळे पोलिसांच्या कार्यप्रणालीवरच प्रश्नचिन्ह लागले आहे.
पोलीस अधीक्षकांपुढे आव्हान
हिंगणघाट शहरात दारूव्यवसाय प्रचंड फोफावला आहे. स्थानिक पोलिसांकडून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. यामुळेच दारूविक्रेत्यांचे मनोबल उंचावले असून हल्ले करण्यापर्यंत मजल गेली आहे. हा प्रकार पोलिस अधीक्षकांपुढे आव्हान निर्माण करणारा आहे.