नाराजांचे पक्षीय उमेदवारांना आव्हान
By admin | Published: February 9, 2017 12:39 AM2017-02-09T00:39:11+5:302017-02-09T00:39:11+5:30
तालुक्यात प्रभावी दावेदार असलेल्या भाजप आणि काँग्रेसमधील उमेदवारांनी पक्षाची उमेदवारी ‘न’ मिळाल्याने अपक्ष नामांकन दाखल करून बंडाळीचा झेंडा उगारला.
दोन प्रमुख पक्षांत बंडखोरी : काहींना नमविण्यात पक्ष नेत्यांना यश
अरुण फाळके कारंजा (घा.)
तालुक्यात प्रभावी दावेदार असलेल्या भाजप आणि काँग्रेसमधील उमेदवारांनी पक्षाची उमेदवारी ‘न’ मिळाल्याने अपक्ष नामांकन दाखल करून बंडाळीचा झेंडा उगारला. परिणामी, अधिकृत उमेदवारापुढे आव्हान उभे ठाकले आहे. पक्षश्रेष्ठींनी आपापल्या पक्षांतील नाराज कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न केले. यात काहींनी माघार घेतली तर काही लढण्याच्या निश्चयाने कायम राहिले. यामुळे पक्षीय उमेदारांनाच नाराजांचेच मोठे आव्हान राहणार असल्याचे दिसते.
ठाणेगाव जि.प. सर्कलमध्ये ठाणेगाव हे सर्वात मोठे गाव आहे. या गावातील सुलोचना धुर्वे आणि मंदा धुर्वे यांनी काँग्रेसची उमेदवारी मागितली होती; पण तरोडा या लहान गावातील पुष्पा सलामे यांना उमेदवारी देण्यात आली. ठाणेगाव येथून काही राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते काँग्रेसमध्ये आले. त्यांनीही ठाणेगाव येथील इच्छुकाला उमेदवारी द्यावी, असा हेका होता; पण तसे न झाल्याने नाराजी पसरली. परिणामी, मंदा धुर्वे व सुलोचना धुर्वे यांनी अपक्ष नामांकन दाखल केला होता. अखेर त्यांची समजूत काढण्यात काँगे्रस नेत्यांना यश मिळाल्याने मंगळवारी दोघींनीही उमेदवारी मागे घेतली. अशीच अवस्था भाजपाचीही झाली आहे. ठाणेगाव येथील वंदना पंधराम यांनी भाजपाची उमेदवारी मागितली होती; पण ती नाकारून आजनादेवी या लहान गावातील नीता गजाम यांना उमेदवारी देण्यात आली. यामुळे वंदना पंधराम यांनी अपक्ष नामांकन अर्ज दाखल करीत बंडाळी केली. त्यांनी उमेदवारीही मागे घेतली नसल्याने भाजपला मोठे आव्हान आहे. सध्या ठाणेगावचे नागरिक दोन्ही पक्षांवर नाराज आहेत.
कन्नमवारग्राम जि.प. गटात रूपाली तेलखेडे आणि ललीता मिठालाल चोपडे या दोन्ही जुन्या कार्यकर्त्यांनी भाजपला उमेदवारी मागितली होती; पण अगदी वेळेवर दोघीनांही बगल देत नव्याने पक्षात प्रवेश करणाऱ्या सरिता विजय गाखरे यांना उमेदवारी देण्यात आली. यामुळे ललिता चोपडे व रूपाली तेलखेडे यांनी अपक्ष नामांकन दाखल केले. यातील चोपडे यांनी नामांकन परत घेतले असले तरी तेलखेडे यांची बंडखोरी कायम आहे. याच गटात निलीमा व्यवहारे यांना काँग्रेसने उमेदवारी देऊ नये म्हणून युवक कार्यकर्ते सक्रिय झाले होते; पण युवकांच्या भावना लक्षात न घेता निलिमा व्यवहारे यांनाच काँग्रेसने उमेदवारी देत युवकांची नाराजी ओढवून घेतली.
पारडी जि.प. गटाकरिता भाजपातर्फे मोहन चौधरी यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाली होती; पण ऐनवेळी सारवाडी येथील सुरेश खवशी यांना उमेदवारी देत घराणेशाहीवर शिक्कामोर्तब केले. परिणामी, मोहन चौधरी यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करीत बंडाळी केली; पण नेत्यांनी त्यांची मनधरणी केल्याने त्यांनी माघार घेतली. काँग्रेसतर्फे या गटात संजय खोडे, सितेश्वर भादे व ज्येष्ठ नेते मेघराज चौधरी प्रभावी दावेदार होते. मेघराज चौधरी यांना उमेदवारी दिल्याने संजय खोडे यांनी अपक्ष अर्ज दाखल करीत विरोध नोंदविला. शिवाय ते रिंगणात असल्याने काँग्रेसला निवडणूक जड जाणार आहे. पारडी गटात दोन्ही पक्षांत कलह निर्माण झाल्याने विजयाचे गणित चुकण्याची शक्यता आहे.
सिंदीविहिरी जि.प. गट काँग्रेससाठी निकोप आहे. येथून चंदा जयसिंग घाडगे यांचा एकमेव अर्ज आहे. भाजपातर्फे प्रमिला ढोले व रेवता हरिभाऊ धोटे यांनी उमेदवारी मागितली होती. प्रमिला ढोले रा. सिंदीविहिरी यांनी उमेदवारी मिळणार या आशेवरच काही महिन्यांपूर्वी भाजपात प्रवेश केला होता; पण त्यांना उमेदवारी न देता भाजपाचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ धोटे यांच्या पत्नी रेवता धोटे यांना उमेदवारी देण्यात आली. यामुळे प्रमिला ढोले यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी जाहीर केली. त्यांनी माघार न घेतल्याने भाजपाला धोका होण्याची शक्यता आहे. एकंदरीत भाजपाचे अधिकृत उमेदवार आणि बंडखोर तसेच काँग्रेसचे अधिकृत उमेदवार व बंडखोर यांच्यातच घमासान होण्याची शक्यता आहे. यात दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. अमर काळे आणि दादाराव केचे यांना अधिकृत उमेदवार निवडून आणण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
चारपैकी तीन गटांत काही अपक्षांनी माघार घेतली; पण कन्नमवारग्राम गटात काही रिंगणात असलेले एक गट व दोन गणाचे अपक्ष उमेदवाद जोडून भाजप कार्यकर्ते सोमराज तेलखेडे यांनी कारंजा तालुका विकास आघाडी तयार केली आहे. आता बंडखोर व अपक्षांचे काँगे्रस व भाजपच्या उमेदवारांपूढेच कडवे आव्हान राहणार आहे. शेवटी मतदार कुणाला पसंती देतात, हे निकालानंतरच कळणार आहे.