तीन दिवसांत १.०१ कोटी खर्चाचे आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 11:36 PM2018-03-28T23:36:31+5:302018-03-28T23:36:31+5:30
शासन दरबारी प्रतिनिधीत्व करणारे जिल्ह्यात चार आमदार आहेत. यापैकी दोन काँग्रेस तर दोन भाजपाचे आहे. त्यांना २०१७-१८ या आर्थिक वर्षात ८ कोटी ९२ लाखांचा विकास निधी मंजूर झाला होता.
महेश सायखेडे।
ऑनलाईन लोकमत
वर्धा : शासन दरबारी प्रतिनिधीत्व करणारे जिल्ह्यात चार आमदार आहेत. यापैकी दोन काँग्रेस तर दोन भाजपाचे आहे. त्यांना २०१७-१८ या आर्थिक वर्षात ८ कोटी ९२ लाखांचा विकास निधी मंजूर झाला होता. यातील ७.९० कोटी रुपये त्यांनी आजपर्यंत खर्च केले. उर्वरित १.०१ कोटींचा निधी तीन दिवसांत खर्च करण्याचे आव्हान आमदारांसमोर आहे. अन्यथा तो निधी परत जाणार आहे. यावर्षी ७.६२ कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली, हे विशेष!
राज्य शासनाकडून प्रत्येक आमदाराला वर्षाचा दोन कोटींचा विकास निधी दिला जातो. हा निधी त्यांनी गरजेनुसार रस्ते, गटारी, पूर संरक्षण भिंत, स्मशानभूमी आदी विकास कामांसाठी खर्च करणे क्रमप्राप्त असते. या निधीच्या दीडपट विकास कामे करण्याचा अधिकारही आमदारांना शासनाने दिले आहेत. काही आमदार दोन कोटींचा निधीही खर्च करतात; पण काही आमदारांना वर्षभरात हा निधी खर्च करता येत नाही. यामुळे जादाचा निधी खर्चाचा प्रश्नच उपस्थित होत नाही. मागील वर्षीच्या काही अखर्चित निधीसह यंदा एकूण ८.९२ कोटींचा निधी चारही आमदारांकडे होता. यात वर्धा विधानसभेचे आ.डॉ. पंकज भोयर यांना २.२६ कोटी, आर्वी विधानसभेचे आ. अमर काळे यांना २.३४ कोटी, देवळी विधानसभेचे आ. रणजीत कांबळे यांना २.९ कोटी तर हिंगणघाट विधानसभेचे आ. समीर कुणावार यांना २.२२ कोटी विविध विकास कामे सुचवून खर्च करणे क्रमप्राप्त होते. यापैकी आ.डॉ. भोयर यांनी २ कोटी २५ लाख ९२ हजार रुपये, आ. काळे यांनी २ कोटी १२ लाख ९० हजार रुपये, आ. कांबळे यांनी १ कोटी २९ लाख ३० हजार रुपये तर आ. कुणावार यांनी २ कोटी २२ लाख रुपये खर्च केलेत. उर्वरित निधी येत्या तीन दिवसांत खर्च न केल्यास तो शासनाकडे परत जाणार आहे.
समीर कुणावार अव्वल
यंदाच्या वर्षी मार्च अखेरपूर्वीच विविध विकास कामे सूचवून १०० टक्के आमदार विकास निधी आ. समीर कुणावार यांनी खर्च केला आहे. त्यांनी सूचविलेल्या २ कोटी १३ लाख २४ हजार रुपयांच्या विकास कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली असून त्यांनी आतापर्यंत २ कोटी २२ लाख रुपयांचा निधी विविध विकास कामांसाठी खर्च केला आहे. आ. भोयर यांनी ८ हजार रुपयांचा निधी, आ. काळे यांनी २१ लाख ११ हजारांचा निधी तर आ. रणजीत कांबळे यांच्यापूढे ८० लाख ६९ हजारांचा निधी येत्या तीन दिवसांत खर्च करण्याचे आव्हान आहे.
मागील वर्षी अमर काळे होते आघाडीवर
मागील वर्षी वर्धा विधानसभेचे आ.डॉ. भोयर यांना प्राप्त २ कोटींपैकी त्यांनी ८५.७५ टक्के निधी, आर्वीचे आ. अमर काळे यांनी १०० टक्के निधी, देवळी विधानसभेचे आ. रणजीत कांबळे यांनी ९४.७४ टक्के तर हिंगणघाट विधानसभेचे आ. समीर कुणावार यांनी ८७.११ टक्के निधी खर्च केला होता. त्यावेळी अखर्चित निधी शासनाकडे जमा करण्यात आला होता.
७.६२ कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता
यावर्षी आमदार विकास निधीतून जिल्ह्यात विविध विकास कामे करण्यासाठी एकूण ७ कोटी ६२ लाख १२ हजार रुपयांच्या विकास कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. यात आ.डॉ. पंकज भोयर यांनी सूचविलेल्या २ कोटी १३ लाख ३४ हजार रुपये, आ. अमर काळे यांनी सूचविलेल्या २ कोटी १८ लाख ६४ हजार रुपये, आ. रणजीत कांबळे यांनी सुचविलेल्या १ कोटी १६ लाख ९० हजार रुपये तर आ. समीर कुणावार यांनी सूचविलेल्या २ कोटी १३ लाख २४ हजार रुपयांच्या कामांचा समावेश आहे.
अखर्चित निधीत कांबळेंचा वाटा
देवळी-पुलगाव विधानसभा मतदार संघाचे आ. रणजीत कांबळे यांचा सर्वाधिक ८० लाख ६९ हजार रुपयांचा निधी अखर्चित राहिल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यांनी सूचविलेल्या काही कामांना प्रशासकीय मान्यताच मिळाली नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.