विदर्भ भूदान यज्ञ बोर्डाच्या गठनाला देणार आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2019 10:42 PM2019-07-12T22:42:36+5:302019-07-12T22:44:43+5:30
येथील महादेवभाई भवन मध्ये सर्व सेवा संघाची राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक पार पडली. या बैठकीत महाराष्ट्र सरकारने अवैध पद्धतीने भूदान यज्ञ मंडळाचे गठन केले असून त्याला न्यायालयात आव्हान देण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सेवाग्राम : येथील महादेवभाई भवन मध्ये सर्व सेवा संघाची राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक पार पडली. या बैठकीत महाराष्ट्र सरकारने अवैध पद्धतीने भूदान यज्ञ मंडळाचे गठन केले असून त्याला न्यायालयात आव्हान देण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
आचार्य विनोबा भावे यांची १२५ व्या जयंती निमित्ताने राष्ट्रीय संमेलन घेण्याचा निर्णय तसेच महात्मा गांधी आणि कस्तुरबा यांची १५० वी जयंती २ आक्टोबर २०२० पर्यंत साजरी करण्यात येणार असल्याचे सर्व सेवा संघाच्या प्रसिद्धी पत्रकातून कळविले आहे. पत्रकात मध्यप्रदेश भूदान यज्ञ अधिनियम १९५३ च्या कलम ३३ (अ) नुसार सर्व सेवा संघाद्वारे बोर्डाचे पदाधिकारी आणि सदस्यांना नामित करण्याचे प्रावधान आहे; पण सरकारने अशा संस्थाद्वारा नामित व्यक्तींची समिती बनविली जी वास्तवात नाही. महाराष्ट्र सरकारने आतापर्यंत सर्व सेवा संघाद्वारा नामित व्यक्तीना भूदान मंडळावर घेण्यात आलेले आहे. ही पहिलीच वेळ ज्यातून उल्लंघन झाल्याचे दिसून आल्याचा आरोप पत्रकातून करण्यात आला आहे. बैठकी बाबत सर्व सेवा संघाचे अध्यक्ष महादेवभाई विद्रोही यांनी सांगितले की, ११ सप्टेंबर २०१९ मध्ये भूदान आंदोलनाचे प्रणेते आचार्य विनोबा भावे यांची १२५ जयंती सुरू होणार आहे. या बाबत राष्ट्रीय स्तरावर संमेलन आयोजित करण्यात येणार आहे. देशात वेगवेळ्या भागात पदयात्रा काढण्यात येणार असून विनोबा भावे यांच्या जीवन आणि कार्यावर पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. बैठकीत माजी आय. पी. एस. अधिकारी संजीव भट्ट यांना चुकीच्या पद्धतीने फसविल्याने हा चिंतेचा विषय असून या प्रकरणाच्या चौकशीसाठी न्यायिक आयोग गठीत करण्याची मागणी करण्याचे ठरले. शिवाय म. गांधी व कस्तुरबा यांची १५० वी जयंती २ आक्टोंबर २०२० पर्यंत साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला.