रेशन दुकानातून साखरीसह चना व तूर डाळ बेपत्ता
By admin | Published: March 13, 2017 12:45 AM2017-03-13T00:45:09+5:302017-03-13T00:45:09+5:30
होळीचा सण म्हटला की घरोघरी पुरण पोळी असते. हीच पुरण पोळी सर्वसामान्यांकरिता यंदाच्या होळीत महागडी ठरणार आहे.
अनागोंदी कारभार : होळीची पुरणपोळी महागच
\वर्धा : होळीचा सण म्हटला की घरोघरी पुरण पोळी असते. हीच पुरण पोळी सर्वसामान्यांकरिता यंदाच्या होळीत महागडी ठरणार आहे. ऐन होळीच्या तोंडावर स्वस्त धान्य दुकानातून तूरीसह चना डाळ आणि साखरही बेपत्ता झाली आहे. शासनाच्या या अनागोंदी धोरणामुळे पुरणाकरिता पाहिजे असलेली चना डाळ व साखर गरजवंतांना बाजारातून महागड्या दराने विकत घ्यावी लागणार आहे.
कुणी उपाशी राहू नये याकरिता शासनाच्यावतीने स्वस्त दरात प्रत्येकाला धान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला. यातच वर्धा जिल्हा आत्महत्याग्रस्त जिल्हा असल्याने विशेष पॅकेज अंतर्गत शेतकऱ्यांकरिता स्वस्त धान्य दुकानातून शासकीय दरात धान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. असे असताना शासनाच्या या योजनेत धान्य पुरविण्याकरिता शासन कमी पडत असल्याचे दिसून आले आहे.
या योजनेतील लाभार्थ्यांकरिता धान्य मंजूर झाले तरी ते वितरण प्रणालीत असलेल्या दोषामुळे अद्याप दुकानात पोहोचले नसल्याचे वर्धेतील वास्तव आहे. सर्वत्र धान्याची मागणी असताना यातही केवळ गहू आणि तांदूळ मंजूर झाले. तूर व चना डाळीकरिता आणि साखरेकरिता लाभार्थ्यांची भटकंतीच होत आहे. शेतमालाचे पडलेले भाव आणि घसरलेली आर्थिक पत यामुळे सणाच्या दिवसात या योजनेतून किमान साखर मिळावी, अशी शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांची अपेक्षा होती; पण शासनाच्या अनागोंदी धोरणामुळे त्यांना सणाच्या दिवसात साखरेपासूनही वंचित राहावे लागत आहे.
शासनाने शेतकरी लाभार्थ्यांसाठी मंजूर केलेला गहू व तांदूळ दुकानात पोहोचला नाही. यामुळे त्यांना सणाच्या तोंडावर वर्धेतील स्वस्त धान्य दुकानातून रिकाम्या हाताने परत जावे लागले आहे. याकडे शासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.(प्रतिनिधी)
शासनाकडून केवळ गहू आणि तांदूळच मंजूर
स्वस्त धान्य दुकानातून गहू, तांदूळ, डाळ आणि साखर आदींचा पुरवठा करण्याच्या सूचना आहेत; पण शासन स्तरावर या सूचनांना बगल दिली जात असल्याचे दिसते. जिल्हा पुरवठा विभागाच्यावतीने सर्वच धान्याची मागणी शासनाकडे करण्यात आली असता त्यांच्याकडून केवळ गहू आणि तांदळाचा पुरवठा करण्यात आला. इतर धान्य केव्हा येईल याची शाश्वतीही दिसत नसल्याची माहिती पुरवठा विभागातील सुत्रांनी दिली.