चंदन तस्कर पसार; दुचाकीसह साहित्य जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 10:11 PM2018-02-14T22:11:26+5:302018-02-14T22:12:14+5:30
गस्तीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना सेवाग्राम भागातील तलाव परिसरात सुमारे तीन जण संशयास्पद हालचाली करीत असल्याची माहिती मिळाली. यावरून त्यांनी घटनास्थळ गाठले;
ऑनलाईन लोकमत
वर्धा : गस्तीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना सेवाग्राम भागातील तलाव परिसरात सुमारे तीन जण संशयास्पद हालचाली करीत असल्याची माहिती मिळाली. यावरून त्यांनी घटनास्थळ गाठले; पण पोलीस येत असल्याची चुणूक लागताच चंदन तस्कर असलेल्या तीनही व्यक्तींनी घटनास्थळावरून यशस्वी पळ काढला. पोलिसांनी घटनास्थळावरून चंदनाचे लाकूड, दोन दुचाकी, कुºहाड तसेच कटर जप्त केले आहे.
काही दिवसांपूर्वी शहर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील बजाजवाडी व जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या निवासस्थानावरून अज्ञात चोरट्यांनी चंदनाची मोठी झाडे तोडून नेली होती. दोन्ही घटनांची नोंद शहर पोलिसांनी घेतली आहे. तेव्हापासून चंदन चोर व चंदनाची तस्करी करणाऱ्यांचा शोध पोलीस घेत होते. दरम्यान, तीन अज्ञात व्यक्ती सेवाग्राम भागातील तलाव परिसरात संशयास्पद हालचाली करीत असल्याची माहिती मिळाली. यावरून दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठत पाहणी केली. दरम्यान, संधी साधून तीनही संशयितांनी दुचाकी व इतर साहित्य तेथेच सोडून पोबारा केला. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी परिसराची बारकाईने पाहणी केली असता त्यांना चंदनाचे लाकूड व दुचाकी तसेच लाकूड कापण्यासाठी वापरण्यात येणारे शस्त्र आढळून आल्याचे पोलिसांनी सांगितले.
सदर पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनेची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देताच उपविभागीय पोलीस अधिकारी माधव पडिले, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी आपल्या पथकासह घटनास्थळ गाठले. या घटनेची शहर पोलिसांनी नोंद घेतली असून पसार झालेल्या चंदन तस्करांचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. सदर प्रकरणी शोन अंबादास बेलूकर रा. शारदानगर यांच्या तक्रारीवरून शहर ठाण्यात भादंविच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.