चंद्रशेखर आझाद यांच्या अटकेच्या निषेधार्थ बजाज चौकात रास्तारोको
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2018 04:51 PM2018-12-29T16:51:33+5:302018-12-29T16:57:04+5:30
भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांना मुंबई पोलिसांनी कोणतेही कारण न सांगता हॉटेलमधून ताब्यात घेत अटक केली. याच घटनेच्या निषेधार्थ स्थानिक बजाज चौकात शनिवारी सकाळी रास्तारोको आंदोलन करण्यात आले.
वर्धा - भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांना मुंबई पोलिसांनी कोणतेही कारण न सांगता हॉटेलमधून ताब्यात घेत अटक केली. याच घटनेच्या निषेधार्थ स्थानिक बजाज चौकात शनिवारी सकाळी रास्तारोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्त्व भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष आशिष सोनटक्के यांनी केले.
कोणतेही कारण नसताना चंद्रशेखर आझाद यांना मुंबई पोलिसांनी हॉटेलमधून ताब्यात घेत अटक केली. हा प्रकार निंदनीय आहे. याप्रकरणी योग्य कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी लावून धरली होती. आंदोलनाची माहिती शहर पोलिसांना मिळताच पोलिसांनी आंदोलन स्थळ गाठून सुमारे 30 आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन शहर पोलीस ठाण्यात नेले. या आंदोलनामुळे बजाज चौकातील वाहतूक काही काळाकरिता खोळंबली होती. आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी खोळंबलेली वाहतूक सुरळीत केली. या आंदोलनात आकाश टोनपे, सचिन पंडित, आशिष सलोडकर, बबलू राऊत, आशिष लोखंडे, दीपक गेडाम, सागर बाभळे, अलकेश पानबुडे, निखिल भानसे, अरविंद सेलकर, आशिष थुल, मयूर मांवटकर, स्वप्नील गाजरे, बंटी रंगारी, विलास गोरखेडे, आशिष रणधीर, अक्षय पाटील यांच्यासह भारिप व भीम आर्मीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.