बावनकुळेंची दुसऱ्यांदा फजिती; माईक पुढे करताच महिलेनं सांगितली महागाई

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2023 12:15 PM2023-11-02T12:15:34+5:302023-11-02T12:29:20+5:30

मोदी सरकारच्या गेल्या ९ वर्षात झालेल्या विकासकामांचा आणि योजनांचा लेखाजोखाच जनतेसमोर ठेवण्याचं काम सुरू आहे.

Chandrashekhar Bawankule's troll for the second time, woman said inflation in wardha after questioning of who is next PM | बावनकुळेंची दुसऱ्यांदा फजिती; माईक पुढे करताच महिलेनं सांगितली महागाई

बावनकुळेंची दुसऱ्यांदा फजिती; माईक पुढे करताच महिलेनं सांगितली महागाई

वर्धा - भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे राज्यातील भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत आहेत. त्यावेळी, जनतेच्या मनातील भावी पंतप्रधान कोण, हे जाणून घेण्याचाही ते प्रयत्न करतात. भाजपाच्या महाविजय २०२४ संकल्प यात्रेनिमित्ताने चंद्रशेखर बावनकुळेवर्धा जिल्ह्यात होते. येथील स्थानिकांशी संवाद साधताना, त्यांनी पुन्हा एकदा २०२४ साली कोण पंतप्रधान व्हावं असा प्रश्न एका महिलेला विचारला. त्यावेळी, महिलेच्या उत्तराने बावनकुळे यांची दुसऱ्यांदा फजिती झाली.

मोदी सरकारच्या गेल्या ९ वर्षात झालेल्या विकासकामांचा आणि योजनांचा लेखाजोखाच जनतेसमोर ठेवण्याचं काम सुरू आहे. भाजपचे अनेक ज्येष्ठ नेते आणि मंत्री जनतेत मिसळून लोकसंपर्कातून मोदींचा प्रचार करत आहेत. त्यासाठी, चंद्रशेखर बावनकुळे यांनी रत्नागिरीत लोकांच्या मनातील भावना जाणून घेतल्या होत्या. त्यावेळी, एका तरुणाला बावनकुळेंनी २०२४ च्या पंतप्रधानाबद्दलचा प्रश्न विचारला होता. त्यावर, राहुल गांधी हे उत्तर दिल्याने प्रदेशाध्यक्षांची पंचायत झाली होती. त्यानंतर, आता पुन्हा एकदा वर्धा जिल्ह्यात अशीच फजिती बावनकुळेंची झाली आहे.  

वर्धा शहरातील साई मंदिर ते अंबिका चौकापर्यंतच्या यात्रेदरम्यान महिलांना २०२४ मध्ये देशाचे पंतप्रधान कोण पाहिजे असा सवाल चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. त्यावर वर्ध्यातील महिलेने महागाईवरुन संताप व्यक्त केला. महिलेची भावना लक्षात येताच बावनकुळे यांनी महिलेसमोर धरलेला माईक खाली घेतला. या घटनेचा व्हिडीओही सध्या व्हायरल होत आहे. त्यामध्ये, महिलेने वाढत्या महागाईवर भाष्य करत संताप व्यक्त केल्याचं दिसून येते. सरकार विजेचे बिल वाढवून देतं, सिलेंडर वाढवून देतं, आम्हाला काम धंदे नाही, माती खायची का?, असा थेट सवाल महिलेनं यावेळी विचारला. त्यावर, आपण स्टेजवर बोलू, तुम्ही स्टेजवर चला, असे म्हणत बावनकुळे यांनी प्रसंग सावरण्याचा प्रयत्न केला. 

रत्नागिरीतही तरुणाने दिले वेगळेच उत्तर

चंद्रशेखर बावनकुळे हे सध्या राज्यभर दौरे करत असून भाजपाच्या विकासकामांची आणि सरकारी योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवत आहेत. रत्नागिरीमध्येही त्यांनी रस्त्यावर उतरुन जनतेशी, व्यापाऱ्यांशी संवाद साधला होता. त्यावेळी, काहींना आगामी निवडणुकांमध्ये पंतप्रधान कोण होईल, असा प्रश्न केला. २०२४ च्या निवडणुकीत पंतप्रधान कोण व्हावं, असं तुम्हाल वाटतं, असा सवाल बावनकुळे यांनी केला होता. त्यावर, एका युवकाने राहुल गांधींचं नाव घेतलं. तरुणाने राहुल गांधींचं नाव घेतल्याने भाजपा प्रदेशाध्यक्षांच्या चेहऱ्यावरील हावभावच बदलले. त्यावेळी, त्यांनी शांतपणे प्रतिक्रिया देत, ४५० पैकी एकजण राहुल गांधींच्या पसंतीचा आहे, असे म्हणत त्या युवकाचे धन्यवाद मानले. मात्र, या तरुणाच्या उत्तराने बावनकुळेंचा चेहराच पडला होता.
 

 

Web Title: Chandrashekhar Bawankule's troll for the second time, woman said inflation in wardha after questioning of who is next PM

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.