वातावरणातील बदलाने आजारांत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 11:14 PM2017-09-11T23:14:49+5:302017-09-11T23:15:11+5:30
अत्यल्प पाऊस, तापलेले उन्ह आणि निर्माण झालेले दमट वातावरण यामुळे विविध आजार डोके वर काढत असल्याचे दिसते.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : अत्यल्प पाऊस, तापलेले उन्ह आणि निर्माण झालेले दमट वातावरण यामुळे विविध आजार डोके वर काढत असल्याचे दिसते. व्हायरल फीवरसह अन्य आजारांच्या रुग्णांतही वाढ होत असल्याने शासकीय रुग्णालये फुल्ल असून खासगी दवाखान्यांमध्येही गर्दी वाढली आहे. प्रत्येक घरात एक रुग्ण दिसून येत असल्याने नागरिक त्रस्त आहेत.
यंदा समाधानकारक पाऊस येईल हे भाकित खोटे ठरले असून जिल्ह्यात अद्यापही पावसाने सरासरी गाठली नाही. परिणामी, रोगट वातावरणाची निर्मिती झाली आहे. कधी ढग तर कधी तप्त उन्ह यामुळे सर्दी, खोकला, ताप तथा डासांमुळे मलेरियासदृश्य आदी आजारांत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. रुग्णालयांसह खासगी दवाखाने सध्या याच रुग्णांनी भरलेले दिसतात. वातावरणाचा सर्वाधिक परिणाम चिमुकल्यांवरच दिसत असून त्यांची जोपासणा कररण्याचा सल्ला वैद्यकीय व्यावसायिक देतात.
सेलू ग्रामीण रुग्णालयात वाढली गर्दी
सेलू/घोराड : वातावरणातील बदलामुळे रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ होत आहे. सेलूच्या ग्रामीण रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात रुग्णांची संख्या मागील आठवड्यात वाढली आहे. दररोज येथील बाह्यरुग्ण विभागात ३०० पेक्षा अधिक रुग्ण आरोग्य तपासणीकरिता येत आहे. एखाद्या दिवशी यापेक्षाही अधिक रुग्ण दिसून येतात. या रुग्णालयात एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्णांची तपासणी करण्यासाठी एकच वैद्यकीय अधिकारी आहे. प्रत्येक रुग्णाच्या तपासणीकरिता लागणारा वेळ पाहता रुग्ण आपल्याला बोलविण्याच्या प्रतीक्षेत रांगेत ताटकळत असतात. येथील बाह्यरुग्ण विभाग हा दुपारी उशिरापर्यंत सुरू ठेवला जात आहे. ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना समाधानकारक वैद्यकीय सेवा मिळत असल्याने या परिसरातील रुग्ण प्रथम ग्रामीण रुग्णालयाला प्राधान्य देतात; पण रुग्णांची वाढती गर्दी लक्षात घेता बाह्यरुग्ण विभागात सकाळ पाळीत दोन वैद्यकीय अधिकाºयांची नियुक्ती केल्यास रुग्णांना रांगेत ऊभे राहण्याची वेळ येणार नाही. संबंधित विभागाने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
सर्दी ,ताप, खोकला,हे रुग्ण अधिक प्रमाणात आढळून येत आहे. व्हायरल फीव्हर असल्याने रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. सकाळ पाळीत रुग्ण अधिक असतात.
- डॉ. अभिजीत हरणे, वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालय, सेलू.