Video : मुख्यमंत्र्यांच्या भाषणाला 'पन्नास खोके अन् वेगळ्या विदर्भा’ची सलामी!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2023 01:52 PM2023-02-03T13:52:19+5:302023-02-03T14:11:20+5:30
अ. भा. मराठी साहित्य संमेलन : निदर्शकांना आवरण्यासाठी पोलिसांची दमछाक
गजानन चोपडे
वर्धा : दोन तास पन्नास मिनिटे चाललेल्या ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरू होताच ‘पन्नास खोके, एकदम ओके... आणि विदर्भातील ५० हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्येला जबाबदार कोण, असा सवाल करीत काहींनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे सम्मेलनस्थळी एकच गोंधळ उडाला. घोषणाबाजी करणाऱ्यांना आवरण्यासाठी पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागली. अचानक उडालेला गोंधळ बघून मंचावरील मान्यवर मंडळीदेखील अवाक् झाली. यावेळी विदर्भवाद्यांनीदेखील यात उडी घेऊन सभामंडप दणाणून सोडला.
महात्मा गांधी साहित्य नगरीतील आचार्य विनोबा भावे सभामंडपातील प्राचार्य राम शेवाळकर व्यासपीठावर साहित्य संमेलनाचे उद्घाटनपर भाषण करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरुवात केली. हे साहित्यिकांचे व्यासपीठ असून, येथे राजकीय चर्चा नको, असे आवर्जून सांगणारे मुख्यमंत्रीच जेव्हा खुद्द समृद्धी महामार्गाचे महिमामंडन करू लागले. तेव्हा अचानक रसिकश्रोत्यांमध्ये बसलेल्या विरोधकांनी घोषणेचे हत्यार उपसले. 'पन्नास खोके, एकदम ओके...' अशी घोषणा देताच सभामंडपात गोंधळ उडाला.
VIDEO: अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात भाषणासाठी सुरुवात करताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात काही कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी व कागद झळकाविले. पोलिसांनी त्यांना सभा मंडपातून बाहेर नेलं. (व्हिडिओ- मनीष तसरे) pic.twitter.com/HFDpKT48GE
— Lokmat (@lokmat) February 3, 2023
ही घोषणा ऐकून मुख्यमंत्री स्तब्ध झाले. 'हे सर्वसामान्यांचे सरकार आहे, त्यामुळे त्यांचेही प्रश्न आपण ऐकून घेऊ', असे मंचावरून सांगत मुख्यमंत्र्यांनी आपले भाषण सुरूच ठेवले. त्यानंतर महिला निदर्शकांनी विदर्भातील ५० हजार शेतकरी आत्महत्येला जबाबदार कोण आणि नंतर वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी घोषणा दिल्या. अचानक झालेला हा प्रकार बघून मान्यवरांच्या भाषणात रमलेले पोलिस अलर्ट मोडवर आले. आंदोलकांना ताब्यात घेऊन सभामंडपातून बाहेर काढत पोलिस ठाण्यात नेण्यात आले. या गोंधळानंतर मात्र हळूहळू सभामंडपातील खुर्च्या रित्या होऊ लागल्या. शिवाय कुणालाही अपेक्षित नसलेल्या या प्रकाराची साहित्यनगरीत दिवसभर चर्चा रंगली होती.