कोरोनामध्ये ‘चॅटिंग’मुळे संसाराची ‘सेटिंग’ बिघडली; 25 कुटुंबे दुभंगली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 05:00 AM2021-04-19T05:00:00+5:302021-04-19T05:00:10+5:30
घटस्फोटाच्या या वाढत्या आलेखातून कुटुंबसंस्थेला घरघर लागल्याची बाब उघड झाली. गेल्या वर्षभरापासून कोरोनाने कहर केला आहे. यातच लाॅकडाऊनमध्ये अनेक जण घरीच बंदिस्त झाले. त्यामुळे अनेकांचे विवाहबाह्य संबंध चव्हाट्यावर आले. पत्नी जास्त वेळ मोबाईलवर चॅटिंग करीत असल्याने पतीच्याही संशयी वृत्तीत वाढ झाली. हातचे काम गेल्याने मद्यपान करून पत्नीस मारझोड करणाऱ्यांची संख्यादेखील वाढली.
चैतन्य जोशी
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कोरोनात पती-पत्नी घरीच बंदिस्त झाले होते. बाहेर ये-जा बंद असल्याने सोशल मीडियावर पती, पत्नीचं इतरांशी चॅटिंग करण्याचे प्रमाण वाढले तसेच संशयी वृत्ती अन् मद्यपानही वाढले. यामुळे दाम्पत्यात खटके उडू लागले आणि प्रकरण थेट न्यायालयात पोहोचले. जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत न्यायालयात घटस्फोटासाठी १७८ दावे दाखल करण्यात आले. यापैकी २५ दाव्यांमध्ये जोडप्यांचे घटस्फोट झाल्याची माहिती आहे.
घटस्फोटाच्या या वाढत्या आलेखातून कुटुंबसंस्थेला घरघर लागल्याची बाब उघड झाली. गेल्या वर्षभरापासून कोरोनाने कहर केला आहे. यातच लाॅकडाऊनमध्ये अनेक जण घरीच बंदिस्त झाले. त्यामुळे अनेकांचे विवाहबाह्य संबंध चव्हाट्यावर आले. पत्नी जास्त वेळ मोबाईलवर चॅटिंग करीत असल्याने पतीच्याही संशयी वृत्तीत वाढ झाली. हातचे काम गेल्याने मद्यपान करून पत्नीस मारझोड करणाऱ्यांची संख्यादेखील वाढली. त्यानंतर दाम्पत्यात खटके उडू लागले. त्यातूनच वाद पोलीस ठाण्यात पोहोचला. काही प्रकरणांमध्ये तडजोड झाली, तर अनेक प्रकरणे न्यायालयात दाखल झाली.
गेल्या तीन महिन्यांत न्यायालयात तब्बल १७८ दावे दाखल करण्यात आले. त्यापैकी २५ दाव्यांमध्ये जोडप्यांना घटस्फोट मिळून ते विभक्त झाले, तर अनेक प्रकरणांत तडजोड होऊन त्यांचा संसार सुरळीत सुरू झाल्याची माहिती आहे. त्यामुळे लाॅकडाऊनमध्ये घटस्फोटाचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे.
कशामुळे झाले विभक्त?
माझा प्रेमविवाह झाला होता. लग्न झाल्यावर दोन ते तीन महिने सर्व व्यवस्थित चालले. पण, त्यानंतर पती दररोज रात्री मद्यपान करून यायचा. घरातील नातेवाइकांची ढवळाढवळ वाढली. अनेकदा पतीला सांगितले. समजाविण्याचा प्रयत्नही केला. पण, त्याने दखल घेतली नाही. त्यामुळे न्यायालयात घटस्फोटासाठी दावा दाखल केला आणि आम्ही दोघे विभक्त झालो.
लॉकडाऊनमध्ये पतीचे काम सुटले. पैशाची चणचण वाढली. पती दररोज मद्यपान करून मारझोड करायचा. पोलिसांत तक्रारही दाखल केली. भरोसा सेलमध्ये दोघांचे समुपदेशनही झाले. पण, काहीही फरक पडला नाही. त्यामुळे घटस्फोटासाठी दावा दाखल केला आणि आम्ही दोघे वेगळे झालो.
सोशल मीडियाचा अतिरेक, पैशाची चणचण
सोशल मीडियाचा अतिरेक वापर, मोबाईल फोनद्वारे वेळी-अवेळी जास्त प्रमाणात बोलणे, त्यातून निर्माण होणारे संशय, सिनेमातील लाइफ स्टाईलचे अनुकरण, उच्च शिक्षणामुळे वाढलेल्या अवास्तव अपेक्षा आणि अहंकार, इतर नातेवाइकांची ढवळाढवळ, नोकरी, अवेळी आणि कुटुंबाच्या विरोधात केलेले लग्न, मद्यपान करून मारहाण आदी कारणांमुळे कौटुंबिक नात्यात दुरावा निर्माण होत असल्याचे या दाव्यातून निदर्शनास आले आहे. न्यायव्यवस्थेकडून या दाव्यांमधील पती पत्नी व त्यांच्या नातेवाइकांचे समुपदेशनही केले जाते.
स्त्री ही दुहेरी आव्हान पेलण्याचे काम करीत असते. त्यामुळे तिला समजण्याची गरज आहे. पती पत्नींमध्ये समजुतदारपणा असणे आवश्यक आहे. जर पुरष स्त्रीला समजला तर तो कधीही तिच्याशी वाद करणार नाही.
डॉ.के.पी. निंबाळकर, मानसोपचर तज्ज्ञ