शुभांगी उईके मृत्यूच्या तपासाकरिता खासदार, आमदारांचे मुख्यमंत्र्यांना साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 11:37 PM2018-04-10T23:37:03+5:302018-04-10T23:37:03+5:30
जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील शुभांगी उईके हिच्यावर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप अनेक आदिवासी संघटनांसह जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटनांकडून करण्यात येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील शुभांगी उईके हिच्यावर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप अनेक आदिवासी संघटनांसह जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटनांकडून करण्यात येत आहे. असे असताना जिल्हा पोलीस प्रशासनाकडून या प्रकरणात कुठलीही ठोस कार्यवाही होताना दिसत नाही. यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी खा. रामदास तडस आणि आ. डॉ. पंकज भोयर यांनी मुख्यमंत्र्यांना एका निवेदनातून केली. शिवाय या कुटुंबाला आर्थिक मदत देण्याचीही मागणी त्यांच्याकडून करण्यात आली.
शुभांगी उईके मृत्यू प्रकरणात पहिले आदिवासी संघटना आणि आता वर्धा शहरातील विविध सामाजिक संघटनांनी एकत्र येत जिल्हा पोलीस अधीक्षकांना साकडे घातले. या संघटनांनी केलेल्या मागणीवरून पोलिसांनी प्रारंभी आत्महत्या दर्शविलेल्या या प्रकरणात आता हत्येच्या दिशेने तपास करण्याचे आश्वासन दिले. असे असले तरी सध्या या दिशेने कुठलेही पाऊल उचलल्याचे दिसत नाही. यामुळे जिल्ह्याच्या लोकप्रतिनिधींनी थेट मुख्यमंत्र्यांना निवेदन देत कार्यवाहीची मागणी केली व आर्थिक मदत मिळवून दिली आहे.
कुटुंबाला मुख्यमंत्री सहायता निधीतून दोन लाखांचा धनादेश
शुभांगी उईके या आदिवासी युवतीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचे निवेदन आ. डॉ. पंकज यांनी मुख्यमंत्री व पालकमंत्री यांना दिले होते. सदर कुटुंबाला मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत देण्यात यावी, अशी विनंती पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्र्यांना केली. तत्सम पत्र आ. डॉ. पंकज भोयर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. या पत्रानुसार मुख्यमंत्र्यांनी दोन लाख रुपयांचा धनादेश दिला असून तो उद्या बुधवारी शुभांगीच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात येणार असल्याची माहिती खा. रामदास तडस यांनी दिली.