उगवण क्षमता तपासून सोयाबीन बियाण्यांची लागवड केल्यास फसवणुकीला लागेल ब्रेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 05:00 AM2021-05-16T05:00:00+5:302021-05-16T05:00:11+5:30
मागील वर्षी जिल्ह्यात १ लाख ३८ हजार हेक्टरवर सोयाबीनची लागवड झाली होती. शेतकऱ्यांनी उभ्या पिकाची चांगली निगा घेतल्याने, पीकही बऱ्यापैकी बहरले, परंतु ऐन कापणीच्या वेळी जिल्ह्यात सततचा पाऊस झाला. यामुळे उभ्या सोयाबीन पिकाला त्याचा फटका बसला. हेच सोयाबीन अनेक शेतकऱ्यांनी बियाणे म्हणून राखून ठेवले आहे, तर मध्य प्रदेशातील सोयाबीन बियाणे विदर्भात दाखल झाले आहे. अशा परिस्थितीत हंगामाच्या सुरुवातीलाच शेतकऱ्यांची फसवणूक होण्याची शक्यता आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : मागील वर्षी सोयाबीन पीक अंतिम टप्प्यात असताना सततच्या पावसाने हजेरी लावली. त्यामुळे उभ्या सोयाबीन पिकावर विपरित परिणाम झाले. यंदा जिल्ह्यात १ लाख २३ हजार हेक्टरवर सोयाबीनची लागवड होण्याची शक्यता आहे. सध्या शेतकरी बियाणे खरेदीसाठी तयारी करीत आहेत. शेतकऱ्यांनी सोयाबीनचे बियाणे खरेदी केल्यावर सुरुवातीला कृषी सहायकांच्या उपस्थितीत बियाण्यांची उगवण क्षमता तपासावी. त्यानंतरच सदर बियाण्यांची शेतात लागवड करावी. असे केल्यास यंदाच्या कोविड संकटात फसवणुकीच्या प्रकाराला ब्रेक लागेल, असा सल्ला कृषी तज्ज्ञांनी दिला आहे.
मागील वर्षी जिल्ह्यात १ लाख ३८ हजार हेक्टरवर सोयाबीनची लागवड झाली होती. शेतकऱ्यांनी उभ्या पिकाची चांगली निगा घेतल्याने, पीकही बऱ्यापैकी बहरले, परंतु ऐन कापणीच्या वेळी जिल्ह्यात सततचा पाऊस झाला. यामुळे उभ्या सोयाबीन पिकाला त्याचा फटका बसला. हेच सोयाबीन अनेक शेतकऱ्यांनी बियाणे म्हणून राखून ठेवले आहे, तर मध्य प्रदेशातील सोयाबीन बियाणे विदर्भात दाखल झाले आहे. अशा परिस्थितीत हंगामाच्या सुरुवातीलाच शेतकऱ्यांची फसवणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करताना कृषी केंद्रातून बियाणे खरेदी केल्याचे बिल घेत सुरुवातीला कृषी सहायकांच्या उपस्थितीत खरेदी केलेल्या बियाण्याची उगवण क्षमता तपासावी. उगवण क्षमता चांगली असल्याचे लक्षात आल्यावरच त्या बियाण्याची लागवड करावी. उगवण क्षमता कमी असल्याचे लक्षात येताच शेतकऱ्याने, बियाणे खरेदी केलेल्या देयकाची झेरॉक्स सलग्न करून थेट तालुका कृषी अधिकारी कार्यालयात लेखी तक्रार करावी. तक्रारीची वेळी दखल घेत बियाणे विक्रेता कंपनीवर कृषी विभागाकडून कठोर कार्यवाही करण्यात येणार आहे.
तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या ‘व्हॉट्सॲप’वर थेट करता येणार लेखी तक्रार
nउगवण क्षमता कमी असलेल्या बियाण्याबाबतची तक्रार शेतकऱ्यांना तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या व्हॉट्सॲपवर करता येणार आहे. तालुका कृषी अधिकारी ही तक्रार तातडीने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडे पुढील कार्यवाहीसाठी वळती करणार आहे.
अधिकाऱ्यांच्या समक्ष तपासावी उगवण क्षमता
- सोयाबीनचे बियाणे खरेदी केल्यावर शेतकऱ्यांनी सुरुवातीला कृषी सहायकांच्या उपस्थितीत बियाण्याची उगवण क्षमता तपासावी. याप्रसंगी कृषी सहायक उपस्थित राहिल्यास योग्य पद्धतीने बियाण्यांची उगवण क्षमता तपासता येणार आहे.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी करणार चैाकशीअंती जबाबदारी निश्चित
- एखाद्या कंपनीच्या बियाण्यांची उगवण क्षमता अतिशय कमी असल्याचे लक्षात येताच प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी त्यांच्या अधिकाराचा वापर करून दोषी बियाणे कंपनीवर जबाबदारी निश्चित करून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
फसणूक टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी सोयाबीनचे बियाणे खरेदी केल्यावर कृषी सहायकांच्या उपस्थितीत बियाण्यांची उगवण क्षमता तपासावी. उगवण क्षमता चांगली असल्यावरच सदर बियाण्याची लागवड करावी, तर उगवण क्षमता कमी असल्यास तातडीने तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार करावी. तक्रारीची वेळीच दखल घेत कार्यवाही करण्यात येईल.
- डॉ. विद्या मानकर, प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वर्धा.