केमिकल युनिटला आग ३४ लाखांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 10:29 PM2018-04-19T22:29:50+5:302018-04-19T22:29:50+5:30
रामनगर भागातील एमगिरीतील केमिकल युनिटला गुरूवारी सायंकाळी ५.१५ वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. यात साहित्याचा कोळसा झाला. ही आग कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी यात सुमारे ३४ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येते.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : रामनगर भागातील एमगिरीतील केमिकल युनिटला गुरूवारी सायंकाळी ५.१५ वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. यात साहित्याचा कोळसा झाला. ही आग कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी यात सुमारे ३४ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येते.
गुरूवारी सायंकाळी सव्वापाच वाजताच्या सुमारास एमगिरीतील केमिकल युनिटमधून धूर निघत असल्याचे परिसरातील नागरिकांच्या निदर्शनास आले. दरम्यान, कर्तव्यावर असलेल्या सुरक्षा रक्षकाने एमगिरीचे वरिष्ठ अधिक व नगर पालिकेच्या अग्निशमन विभागाला माहिती दिली. प्रारंभी एमगिरीतील कर्मचाऱ्यांनी आग प्रतिबंधक सिलिंडरचा वापर करून आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला; पण त्यांना यश आले नाही. दरम्यान, अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळ गाठून आगीवर पाण्याचा मारा केला. अर्धा तासाच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविता आले. या आगीत केमिकल युनिटमधील फर्निचर, विविध प्रकारचे रसायन आणि इतर साहित्य जळाल्याने सुमारे ३४ लाखांचे नुकसान झाल्याचे एमगिरीच्या अधिकाºयांनी सांगितले.
आगीची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरल्याने घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी झाली होती. अचानक लागलेल्या आगीमुळे एमगिरी प्रशासनात मात्र खळबळ उडाली होती. माहिती मिळताच रामनगर पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. या घटनेची नोंद रामनगर पोलिसांनी घेतली आहे.