वर्धेच्या एमगिरीतील केमिकल युनिटला भीषण आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 07:58 PM2018-04-19T19:58:56+5:302018-04-19T19:59:17+5:30
रामनगर भागातील एमगिरी परिसरातील केमिकल युनिटला गुरूवारी दुपारी ५.१५ वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. यात विविध साहित्य जळून कोळसा झाले. ही आग कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झाले नसली तरी यात सुमारे ३४ लाखांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येते.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : येथील रामनगर भागातील एमगिरी परिसरातील केमिकल युनिटला गुरूवारी दुपारी ५.१५ वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. यात विविध साहित्य जळून कोळसा झाले. ही आग कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झाले नसली तरी यात सुमारे ३४ लाखांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येते.
गुरूवारी दुपारी ५.१५ वाजताच्या सुमारास एमगिरी भागातील केमिकल युनिटमधून धूर निघत असल्याचे परिसरातील नागरिकांच्या निदर्शनास आले. दरम्यान कर्तव्यावर असलेल्या सुरक्षा रक्षकाने घटनेची माहिती एमगिरीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना देत न.प.च्या अग्निशमन विभागाला दिली. सुरूवातीला एमगिरीतील कर्मचाऱ्यांनी आग प्रतिबंधक सिलिंडरचा वापर करून आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना यश आले नाही. दरम्यान अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळ गाठून आगीवर पाण्याचा मारा करीत अध्या तासाच्या कालावधील आगीवर नियंत्रण मिळविले. या आगीत केमिकल युनिटमधील फर्निचर, विविध प्रकारचे रसायन आणि इतर साहित्य जळाल्याने सुमारे ३४ लाखांचे नुकसान झाल्याचे एमगिरीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. घटनेची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरल्याने घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी झाली होती. अचानक लागलेल्या आगीमुळे एमगिरी प्रशासनात एकच खळबळ उडाली होती. माहिती मिळताच रामनगर पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. या घटनेची नोंद रामनगर पोलिसांनी घेतली आहे.