चिऊताईला आंघोळीला माती, ना घरट्याकरिता जागा

By admin | Published: March 20, 2017 12:39 AM2017-03-20T00:39:44+5:302017-03-20T00:39:44+5:30

शहर असो खेडे, सर्वत्र मोठ्या प्रमाणात सिमेंटीकरण होत आहे. या सिमेंटीकरणात मातीचे आणि कौलारू घर काळाच्या पडद्याआड जात आहे.

Chewatai is the place for nesting in the house for bathing | चिऊताईला आंघोळीला माती, ना घरट्याकरिता जागा

चिऊताईला आंघोळीला माती, ना घरट्याकरिता जागा

Next

जागतिक चिमणी दिन : सिमेंटच्या जंगलात हरवतेय बिचारी ; बचावासाठी पक्षीमित्रांकडून सामूहिक प्रयत्नांचे आवाहन
रूपेश खैरी  वर्धा
शहर असो खेडे, सर्वत्र मोठ्या प्रमाणात सिमेंटीकरण होत आहे. या सिमेंटीकरणात मातीचे आणि कौलारू घर काळाच्या पडद्याआड जात आहे. यामुळे सर्वांच्या लाडक्या चिऊताईला घरटे बांधण्याकरिता जागा आणि आंघोळ घालण्याकरिता मातीच सापडत नाही. परिणामी, शहरात चिऊताईचा अधिवास धोक्यात आला आहे. यामुळे नजरेआड जात असलेल्या या चिऊताईच्या बचावाकरिता सर्वांनी एकत्र येत प्रयत्न करण्याची गरज जागतिक चिमणी दिनानिमित्त पक्षी मित्रांनी व्यक्त केली आहे.
कधी अंगणात तर कधी घराच्या छतावर चीव-चीव करणारी चिऊताई आज नजरेआड जात आहे. ती डोळ्याने क्वचित दिसते. यामुळे येणाऱ्या पिढीला ती चित्रात किंवा बालगीतातच कानी पडते की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे. बहार नेचर फाऊंडेशनच्यावतीने जागतिक चिमणी दिनानिमित्त गत दोन दिवसांपासून पक्षी गणना सुरू केली आहे. तसेही वर्धेत प्रत्येक आठवड्याला येथील पक्षीअभ्यासक पक्षी गणना करतातच! गत दोन दिवसांसह रविवारी सकाळी येथील स्मशानभूमिच्या परिसरात पक्षी अभ्यासकांनी पक्षी गणना केली. यात त्यांना केवळ १२ चिमण्या दिसल्या. यामुळे सिमेंटच्या जंगलात वाढलेली उष्णता आणि तिला आवश्यक असलेली माती मिळत नसल्याने वर्धेतील हिरवळ असलेल्या स्माशानासारख्या जागीही ती नसल्याचे दिसून आले आहे. यामुळे तिच्या बचावाकरिता सर्वांकडून सामूहिक प्रयत्न गरजेचे झाले आहे.

चिमणी अदृश्य होण्याचे शहरी भागात केवळ मोबाईल टॉवरचे वाढते जाळे, हे एक कारण नाही तर वाढते सिमेंटीकरण, हे एक महत्त्वाचे कारण आहे. चिमणीला आंघोळ करण्याकरिता आवश्यक असलेली माती मिळत नसल्याने ती शहरापासून दूर जात असल्याचे एक महत्त्वाचे कारण समोर आले आहे.
- किशोर वानखेडे, अध्यक्ष, बहार नेचर फाउंडेशन, वर्धा

जागतिक चिमणीदिनी घरट्यांचे वाटप
सिमेंटच्या जगलात घरट्यांकरिता भटकत असलेल्या चिमणीला मातीचे घरटे व झाडांवर पक्ष्यांकरिता पाणी ठेवण्याकरिता मातीचे भांडे देण्याचा उपक्रम जागतिक चिमणी दिनी बहार नेचर फाउंडेशनच्यावतीने राबविण्यात येत आहे. या उपक्रमात नागरिकांनी पक्षी संवर्धनाकरिता सहभागी होण्याचे आवाहन आहे.

उन्हाळा येतोय.. चिऊताईसाठी पाणी अन् चारा ठेवा
उन्हाळा तापणे सुरू झाला आहे. या दिवसांत पक्ष्यांची पाण्याकरिता भटकंती होते. यामुळे आपल्या घराच्या छतावर, पसरबागेत असलेल्या झाडावर लाडक्या चिऊताईकरिता पाणी ठेवण्याची गरज आहे. पाणी असलेले भांडे खूप खोल नसावे, घराच्या गच्चीवर, बाल्कनीमध्ये, अंगणात पाणी ठेवता येईल. सोबतच तांदळाचे दाणे ठवेले तर एकदम बरेच!

अंगावरील कीटक काढण्याकरिता चिऊताई करते मातीची आंघोळ
आंघोळ करण्याकरिता साधारणत: पाण्याची गरज असते; पण चिऊताईला पाणी नाही तर मातीची गरज आहे. तिच्या अंगावर असलेले किटक काढण्याकरिता चिऊताई मातीची आंघोळ घालते. सर्वत्र झालेल्या सिमेंटीकरणामुळे आघोळ घालण्याकरिता तिला माती मिळत नसल्याने ती जंगलाच्या दिशने निघाली आहे. येथेही पाहिजे त्या प्रमाणात चिमणी दिसत नसल्याचे पक्षी मित्र सांगतात.

गणनेत वर्धेत दिसल्या केवळ १२ चिमण्या
हिरवळ व मातीसह पाणी असलेल्या वर्धेतील स्मानभूमित रविवारी सकाळी बहार नेचर फाऊंडेशनच्यावतीने पक्षी गणना केली. यात त्यांना केवळ १२ चिमण्या दिसून आल्या. या बारा चिमण्यांत पीत कंठी चिमणी असल्याचे सांगण्यात आले. इतर पक्ष्यांत परस मैना, साधी मैना, पांढऱ्या भोवईचा बुलबुल, साधा बुलबूल आदी पक्षी दिसले.

 

Web Title: Chewatai is the place for nesting in the house for bathing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.