तहसीलदारामार्फत मुख्यमंत्र्यांना अळीयुक्त कापूस बोंडाची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 10:02 PM2017-12-14T22:02:03+5:302017-12-14T22:02:25+5:30
बोंडअळीच्या प्रादुर्भावाने तालुक्यातील अनेक शेतकºयांचे कापूस पीक पूर्णत: उध्वस्त झाले असून शेतकरी अडचणीत आला आहे. त्यांना एकरी २५ हजार रुपये रोखीने शासकीय मदत देण्यात यावी अन्यथा मंगळवार पासून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,...
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्वी : बोंडअळीच्या प्रादुर्भावाने तालुक्यातील अनेक शेतकºयांचे कापूस पीक पूर्णत: उध्वस्त झाले असून शेतकरी अडचणीत आला आहे. त्यांना एकरी २५ हजार रुपये रोखीने शासकीय मदत देण्यात यावी अन्यथा मंगळवार पासून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा प्रहार सोशल फोरमचे संस्थापक अध्यक्ष बाळ जगताप यांनी गुरुवारला तहसीलदार विजय पवार यांना दिला. यावेळी त्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनासह अळीयुक्त कापूस बोंडाची भेट पाठविण्यात आली आहे.
अनेक वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे जिल्ह्यातील शेतकºयांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. यात जे खचले त्यांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारला, तर अनेकांनी या संकटासोबत लढा देण्याचा निर्धार केला. आता शेतकºयांपुढे बोंडअळीचे नवीन जैविक संकट उभे ठाकले आहे. शेकडो शेतकºयांचे पीक बोंडअळीने उद्ध्वस्त केले. एकरी २० ते २५ क्विंटल कापूस व्हायला पाहिजे होता तेथे दोन-चार क्विंटल उत्पादन होणे कठीण झाले. परिणामी कापूस लागवडी पासून वेचाईपर्यंतचा झालेल्या खर्चाची परतफेड कशी करावी आणि देणदारांचे देणे कसे फेडावे तसेच परिवाराचा उदरनिर्वाह कसा चालवावा असा बिकट प्रश्न निर्माण झाला.
या संकटातून शेतकºयांना सोडविण्याकरिता शासनाने मंगळवार पूर्वी पाहणी करून बोंडअळी ग्रस्त शेतकºयांना रोखीने २५ हजार रुपयाची मदत द्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल अशी मागणी प्रहार सोशल फोरमच्यावतीने निवेदनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे.
प्रहार संघटनेने यापूर्वी सन २००९ मध्ये धरणग्रस्तांच्या समस्या सोडविण्याकरिता विषप्राशन आंदोलन केले होते. यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता याचीच पुनरावृती होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे.
आर्वी तालुक्यात कपाशीचा मोठ्या प्रमाणात पेरा झाला. कर्जमाफीच्या आशेत शेतकºयांनी बँकेतून कर्ज न घेता उसणवारीवर कपाशीची लागवड केली. यात आता उत्पन्न येणार नसल्याचे चिन्ह असल्याने शेतकºयांची चांगलीच अडचण झाल्याचे दिसत आहे.