वणाच्या पाण्यासाठी मुख्यमंत्र्यांपर्यंत धाव
By admin | Published: June 7, 2015 02:20 AM2015-06-07T02:20:41+5:302015-06-07T02:20:41+5:30
शहरानजीकच्या भूगाव येथील उत्तम गलवा मेटॅलिक या उद्योग समूहाला वणा नदीचे पाणी देण्याचा घाट घातला जात आहे.
उद्योगांना पाणी देण्यास नकार : लोक जनशक्तीसह सर्वांचाच विरोध
वर्धा : शहरानजीकच्या भूगाव येथील उत्तम गलवा मेटॅलिक या उद्योग समूहाला वणा नदीचे पाणी देण्याचा घाट घातला जात आहे. यास लोकजनशक्ती पार्टीसह सामान्य नागरिक व अन्य पक्षांनीही विरोध केला आहे. या प्रकरणी थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत दाद मागण्यात आली असून वणा नदीचे पाणी उत्तम गलवाला देऊ नये, अशी मागणी करण्यात आली आहे.
गत काही दिवसांपासून हिंगणघाट येथील वणा नदीचे पाणी ४० किमीवर असलेल्या भूगावला नेण्यासाठी उत्तम गलवा मेटॅलिक उद्योग समूहाचा खटाटोप सुरू आहे. यासाठी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७ वरील नदीच्या पुलाखाली कंपनीद्वारे विहिरीचे खोदकाम करण्यात आले. या बळजबरीची शासनाने गंभीर दखल घेणे गरजेचे आहे. येथील पाणी उत्तम गलवा कंपनी पाईपलाईनद्वारे नेण्याचे प्रयत्न करीत असून यास लोकजनशक्ती पार्टीने विरोध केला आहे. हिंगणघाट परिसरातील हजारो नागरिकांवर व स्थानिक उद्योगांवर हा अन्याय आहे.
वणा नदी ही हिंगणघाट तालुक्याची जीवन वाहिनी ठरत आहे. उनहाळ्यात तालुक्यात पाणी टंचाई जाणवते. पालिकेला लाखो रुपये खर्च करून पाणी विकत घ्यावे लागते. येथील उद्योगांना पाण्याची नितांत गरज भासते. परिसरातील सामान्य नागरिक वणा नदीच्या पाण्यावर अवलंबून असते. तालुक्यातच पाण्याची गरज असताना येथून जनतेच्या हक्काचे पाणी बळजबरीने नेण्याची कंपनीची भूमिका नियमबाह्य व जनतेवर अन्याय करणारी आहे. राज्य शासनाने हिंगणघाटला नुकतेच टेक्सटाईल पार्क मंजूर केले. यामुळे येथील उद्योगांना, व्यावसायिकांना पाण्याची गरज आहे. उत्तम गलवा कंपनीला अगदी जवळच १२ किमी अंतरावरील धाम नदीचे व धरणाचे पाणी उपलब्ध असताना वणा नदीचे पाणी ४० किमी अंतरावरून नेण्याचा घाट घालणे चुकीचे आहे.
हिंगणघाट व सभोवतालच्या परिसरात अनेक कंपन्या असून तेथे हजारो नागरिक कार्यरत आहेत. येथील उद्योग बंद पडले तर उपासमारीची वेळ आल्याशिवाय राहणार नाही. शिवाय बेरोजगारीत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गांभीर्याने लक्ष देत उत्तम गलवा कंपनीला वणा नदीचे पाणी देण्यात येऊ नये, असा आदेश काढावा, आणि हिंगणघाट व ग्रामीण परिसरातील हजारो ग्रामस्थांना न्याय द्यावा, अशी मागणीही लोकजनशक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष संतोष तिमांडे यांनी निवेदनातून केली.
निवेदन सादर करताना महिला आघाडी जिल्हाध्यक्ष राजश्री दुब्बावार, जिल्हा संघटक केशव तितरे, कोषाध्यक्ष राजेंद्र मुनोत, तालुकाध्यक्ष सुभाष मिसाळ, शहराध्यक्ष मोरेश्वर पिंपळशेंडे, गोविंदा गायकवाड, कमलाकर कावळे, गोविंदा दांडेकर, चंपत बावणे, शब्बीर चुडिवाले, मधुकर डंभारे, मो. याकुब, किसना किन्नाके, चित्रा पाटणे, सपना मुने, लता तितरे, पितांबरी तिमांडे आदी उपस्थित होते.(कार्यालय प्रतिनिधी)
उत्तम गलवाला दिलेली परवानगी रद्द करण्याची मागणी
हिंगणघाट - येथील वणा नदीच्या पात्रातून पाण्याची उचल करण्याची परवानगी उत्तम गलवा मेटॅलिक कंपनीला देण्यात आली आहे. उत्तम गलवा मेटॅलिक यांना हिंगणघाट-वायगाव-देवळी राष्ट्रीय मार्ग २४३ किमी ते २५/५०० मध्ये पाण्याची पाईपलाईन टाकण्याकरिता सार्वजनिक बांधकाम विभाग वर्धा यांनी परवानगी दिली. ही परवानगी रद्द करावी, अशी मागणी माजी आमदार राजू तिमांडे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी निवेदनही सादर केले.
हिंगणघाट क्षेत्रात टेक्सटाईल्स उद्योग, शेतकऱ्यांच्या शेतातील सिंचन, छोटे उद्योग आदींनाही पाणी पाहिजे. हिंगणघाट शहराला वणा नदीतून पाणी पुरवठा होतो. चालू हंगामात मे महिन्यापासून स्मशानभूमी समोरील नदीचे पात्र कोरडे पडले आहे. वणा नदीचा प्रवाह आटल्यामुळे नदीत पाण्याचे डबके पडले आहे. यामुळे वणा नदीच्या परिसराची पाहणी करून उत्तम गलवा कंपनीला पाण्याची पाईपलाईन टाकण्याची दिलेली परवानगी रद्द करावी, पाण्याची उचल करण्याची परवानगी रद्द करावी, अशी मागणीही राजू तिमांडे व कार्यकर्त्यांनी केली.(शहर प्रतिनिधी)