बैल धुण्याकरिता गेलेल्या बालकाचा बुडून मृत्यू
By admin | Published: September 2, 2016 02:01 AM2016-09-02T02:01:14+5:302016-09-02T02:01:14+5:30
तालुक्यातील वानरचुवा येथे पोळ्याच्या सकाळी बैल धुण्याकरिता तलावावर गेलेल्या १५ वर्षीय बालकाचा बुडून दुर्दैंवी अंत झाला.
वानरचुवा येथील घटना : पोळ्याच्या सणावर गावात दु:खाचे सावट
समुद्रपूर : तालुक्यातील वानरचुवा येथे पोळ्याच्या सकाळी बैल धुण्याकरिता तलावावर गेलेल्या १५ वर्षीय बालकाचा बुडून दुर्दैंवी अंत झाला. ही घटना गुरुवारी सकाळी घडली. भूषण प्रकाश शाहारे असे मृतकाचे नाव आहे. तो त्याच्या आई वडिलांना एकुलता एक असल्याने गावात पोळा सणावर शोककळा पसरली आहे.
प्राप्त माहितीनुसार, पोळ्याच्या दिवसी वानरचुवा येथील प्रकाश शाहरे यांचा मुलगा भूषण हा सकाळी गावातील काही नागरिकांसह तलावात आपला एक बैल धुण्याकरिता गेला होता. या वेळी सर्व शेतकरी आपले बैल धुन्यात व्यस्त असताना भूषण व त्याचा बैल खोल पाण्यात गेला. तलावातील या खोल पाण्यात बुडला. तलावानजीक भूषण दिसत नसल्याने त्याचा सर्वत्र शोध घेतला असता तो पाण्यात बुडून असल्याचे दिसून आले. त्याला बाहेर काढून गिरड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले असता डॉ. गायकवाड यांनी त्याला मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच गिरडचे ठाणेदार सुखराम थोटे, मोहगाव ग्रामपंचायतचे उपसरपंच कैलास नवघरे, गिरड ग्रामपंचायतचे उपसरपंच विजय तडस, बहादुरसिंग अकाली, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य फकीरा खडसे, गिरडचे सहायक वनपरीक्षेत्र अधिकारी एम. ओ. राऊत यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात जात माहिती घेतली. पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून तपास सुरू आहे. (तालुका प्रतिनिधी)
विजेच्या धक्क्याने महिलेचा मृत्यू
टाकरखेड- कुलर पडून वायर तुटलेल्या वायरमुळे बसलेल्या विजेचा झटक्यामुळे महिलेचा मृत्यू झाला. ही घटना टाकारखेड येथे गुरुवारी सकाळी घडली. या महिलेला वाचविण्यास गेलेल्या घरातील दोन महिलाही जखमी झाल्या. त्यांच्यावर आर्वी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. पोळा सणाच्या दिवशी घडलेल्या या घटनेने गावात शोककळा पसरली आहे.
लिलाबाई मारोतराव वाणे (६०) असे मृतक महिलेचे नाव आहे, तर वंदना लक्ष्मण वाणे (४५) व संगीता रविंद्र वाणे (४०) सर्व रा. टाकरखेड असे जखमीचे नाव आहे. गुरुवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास लिलाबाई काम करीत असताना विटावर ठेवलेला कुलर त्यांच्या पायावर पडला. याचवेळी वायर तुटल्याने त्यांना विजेचा जबर धक्का बसला. आवाज येताच वंदना आणि संगीता धावत गेल्या. त्यांनाही विजेचा झटका लागला. दोघी ओरडल्याने रविंद्र वाणे यांनी धावत जावून येत मुख्य बटन बंद केली. म्हणून दोघींचा जीव वाचला. अन्यथा या दोघीचांही मृत्यू झाला. लिलाबाई यांच्यामागे पती, दोन मुली, जावई असा मोठा परिवार आहे. त्यांच्यावर स्थानिक मोक्षधामावर सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.(वार्ताहर)