भूमिगत गटार वाहिनीच्या कामाला बालकामगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2020 06:00 AM2020-02-08T06:00:00+5:302020-02-08T06:00:05+5:30
झाशी राणी चौक-गो.से. वाणिज्य महाविद्यालय-गांधी पुतळापर्यंतच्या मार्गावर भूमिगत गटारवाहिनीसाठी जेसीबी यंत्राच्या मदतीने खोदकाम करण्यात आले आहे. सदर खोदकामाचे खड्डे एखाद्या अपघाताला निमंत्रण देणारे असल्याने ये-जा करणाऱ्यांनी दक्ष राहूनच पुढील प्रवास करावा अशा आशयाचा फलक खोदकाम सुरू असलेल्या ठिकाणी कंत्राटदाराच्यावतीने लावण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : अमृत योजनेच्या माध्यमातून मोठा निधी खर्च करून शहरात भूमिगत गटारवाहिनी टाकली जात आहे. परंतु, सदर विकास काम पूर्णत्त्वास नेताना कंत्राटदाराकडून बालकामगार कायद्यालाच बगल दिल्या जात असल्याचे दिसून येत आहे. इतकेच नव्हे तर नाममात्र मोबदला देत अल्पवयीनांकडून अंगमेहनतीचे काम करून घेतले जात असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. परंतु, त्याकडे कामगार अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याचे त्यांच्या कार्यप्रणालीविषयी नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
झाशी राणी चौक-गो.से. वाणिज्य महाविद्यालय-गांधी पुतळापर्यंतच्या मार्गावर भूमिगत गटारवाहिनीसाठी जेसीबी यंत्राच्या मदतीने खोदकाम करण्यात आले आहे. सदर खोदकामाचे खड्डे एखाद्या अपघाताला निमंत्रण देणारे असल्याने ये-जा करणाऱ्यांनी दक्ष राहूनच पुढील प्रवास करावा अशा आशयाचा फलक खोदकाम सुरू असलेल्या ठिकाणी कंत्राटदाराच्यावतीने लावण्यात आला आहे. परंतु, याच ठिकाणी एका अल्पवयीन मुलीकडून अंगमेहनतीचे काम करून घेतले जात असल्याचे लोकमत प्रतिनिधीच्या पाहणीत निदर्शनास आले. या विषयी अधिकची माहिती जाणून घेतली असता कुणीही बोलण्यास तयार नव्हते. तर गत वर्षभऱ्यात एकही बालकामगार वर्धा जिल्ह्यात आढळला नसल्याचे कामगार अधिकारी कार्यालयाच्यावतीने सांगण्यात आले. मात्र, भूमिगत गटारवाहिनीचे काम पूर्णत्त्वास नेणाऱ्या कंत्राटदाराकडून अल्पवयीन मुलीकडून अंगमेहनतीचे काम करून घेतले जात असल्याने जिल्हा कामगार अधिकारी याप्रकरणी काय कार्यवाही करतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
अल्पवयीनांकडून अंगमेहनतीचे काम करून घेणे गुन्हा
अल्पवयीन मुला-मुलींकडून कुठल्याही प्रकारे अंगमेहनतीचे काम करून घेणे हे कायद्यान्वये गुन्हा आहे; पण वर्धा न.प.कडून भूमिगत गटारवाहिनीचे काम मिळालेल्या कंत्राटदाराकडून याच कायद्याला सध्या फाटा दिल्या जात असल्याचे बघावयास मिळते. या प्रकरणी नगरपालिका प्रशासन काय भूमिका घेते, याकडे वर्ध्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
अल्पवयीन मुला-मुलींकडून अंगमेहनतीचे काम करून घेणे हे कायदेशीर गुन्हा आहे. शिवाय ही बाब गंभीर आहे. अभियंत्यांना पाठवून पाहणी करून कंत्राटदाराला तातडीने नोटीस बजावण्यात येईल.
- किशोर साखरकर प्रशासकीय अधिकारी, न.प. वर्धा
गत वर्षभऱ्यात एकही बालकामगार वर्धा जिल्ह्यात आढळलेला नाही. भूमिगत गटारवाहिनीचे काम बालकामगाराकडून करून घेतले जात असल्यास कंत्राटदारावर कठोर कारवाई करण्यात येईल. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल.
- एम. पी. मडावी, जिल्हा कामगार अधिकारी, वर्धा.