...अन् वर्ध्यात होणारा बालविवाह अखेर रोखला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2022 06:20 PM2022-01-06T18:20:20+5:302022-01-06T18:39:05+5:30
हृदयविकाराचा झटका आल्याने नातीचा विवाह आपल्या डोळ्यांसमोर झालेला पाहायचा होता. यासाठी म्हातारीने चक्क अल्पवयीन मुलीचा विवाह जुळविला.
वर्धा : डोक्यावरून आईवडिलांचे छत्र हरविलेल्या मुलीचा विवाह आपल्या डोळ्यांसमोर व्हावा, अशी इच्छा मनात धरून आजारी आजीने चक्क अल्पवयीन मुलीचा विवाह जुळविला. गुरुवारी शहरातील मुख्य मार्गावर असलेल्या शांती भवनात विवाह पार पडणार होता तर अचानक चाईल्ड लाईन आणि महिला व बालविकास कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी सतर्कता दाखवून बालविवाह संपन्न होण्यापूर्वीच रोखला.
गुरुवारी दुपारी १.२५ वाजताच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. यावेळी शहर पोलिसांचीही मदत घेण्यात आली होती.प्राप्त माहितीनुसार, वर्धा शहरातील पूलफैल परिसरातील रहिवासी १६ वर्षीय मुलीच्या आई आणि वडिलांचे ती सात वर्षाची असतानाच निधन झाले होते. तेव्हापासून मुलगी आजी आणि आत्याच्या घरीच राहायची. आजीही सतत आजारी असल्याने तसेच तिला दोन वेळा हृदयविकाराचा झटका आल्याने नातीचा विवाह आपल्या डोळ्यांसमोर झालेला पाहायचा होता.
त्या अनुषंगाने आजी व आत्याने मुलीसाठी वर्ध्यातीलच एक २६ वर्षीय मुलाची पाहणी करून मुलीचा विवाह करण्याचे ठरविले. त्यानुसार, वर्धा शहरातील मुख्य मार्गावर असलेल्या शांतीभवन येथे गुरुवारी अल्पवयीन मुलीचा विवाह सोहळा पार पडणार होता. याची माहिती महिला व बालविकास कार्यालयाला माहिती झाली. त्यांनी तत्काळ चाईल्ड लाईनला याची माहिती देत दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या मदतीने शांतीभवन गाठून होणारा बालविवाह रोखला.
महिला व बाल समिती कार्यालयासमोर हजर
चाईल्ड लाईन आणि महिला व बालविकास समितीच्या अधिकाऱ्यांनी अल्पवयीन मुलीच्या नातेवाईकांकडून हमीपत्र लिहून घेतले तसेच जबाबनामा लिहून घेतला. अधिकाऱ्यांनी मुलीला महिला व बाल विकास समितीसमोर हजर केल्याची विश्वसनीय माहिती आहे.