‘चाईल्ड लाईन’ने रोखला वर्ध्यात हाेणारा बालविवाह!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 05:00 AM2021-07-30T05:00:00+5:302021-07-30T05:00:32+5:30

सभागृह चालकाला विवाह सोहळ्यासाठी सभागृह देताना वर आणि वधू या दोघांचे आधार कार्ड, वयाचा दाखला घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. असे न केल्यास सभागृहचालक, केटरिंगचालक, फोटोग्राफर आदींवर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार असल्याच्या सूचना यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी दिल्या.

Child line stops child marriage in Wardha! | ‘चाईल्ड लाईन’ने रोखला वर्ध्यात हाेणारा बालविवाह!

‘चाईल्ड लाईन’ने रोखला वर्ध्यात हाेणारा बालविवाह!

googlenewsNext
ठळक मुद्देवधू-वर पक्षाकडील मंडळींची कानउघाडणी : कायद्याची दिली माहिती

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कोरोनाच्या संकटात जिल्ह्यातील ग्रामीण भागात बालविवाह करण्याच्या घटना उघडकीस आल्या. मात्र, आता चक्क शहरातही याचे लोण पसरत चालले असून, वर्ध्यातील पावडे चौक परिसरात असलेल्या शाळेसमोरील सभागृहात पार पडणारा बालविवाह चाईल्ड लाईनच्या पुढाकाराने रोखण्यात यश आले आहे. 
वर्ध्यातील रहिवासी २५ वर्षीय युवकाचे नागपूर जिल्ह्यातील एका गावातील १६ वर्षीय मुलीशी विवाह सोहळा होत असल्याची माहिती चाईल्ड लाईनच्या १०९८ या टोल फ्री क्रमांकावर मिळाली. चाईल्ड लाईनचे जिल्हा समन्वयक आशिष मोडक यांनी तत्काळ आपल्या चमूसह बॅचलर रोडवर असलेल्या मंगल कार्यालयात धडक दिली. दरम्यान, तेथे विवाह सोहळा सुरू असल्याचे त्यांना समजले. त्यांनी तत्काळ याबाबतची माहिती जिल्हा बाल संरक्षण अधिकारी कार्यालय आणि बाल कल्याण समितीला दिली. रामनगर पोलीस ठाण्याचे ठाणेदार धनाजी जळक यांच्या मदतीने सर्व पदाधिकारी सभागृहात पोहोचले. त्यांनी वर आणि वधू पक्षाकडील दोन्ही नातलगांची समजूत काढली. बालविवाह करणे हा बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ नुसार गुन्हा ठरत असल्याचे समजावून सांगितले. यावेळी अधिकाऱ्यांनी मुलीकडून जबाबनामा लिहून घेत वयाची १८ वर्षे पूर्ण होईपर्यंत लग्न करणार नाही, असे लिहून घेण्यात आले. यावेळी चाईल्ड लाईनच्या  सामाजिक कार्यकर्त्या जयश्री निवल, माधुरी शंभरकर, सूरज वानखेडे, आशिष हिरुळकर, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी माधुरी भोयर तसेच रामनगर पोलीस ठाण्याचे ठाणेदार धनाजी जळकसह कर्मचाऱ्यांची   उपस्थिती होती. सध्या मुलीला बालकल्याण समितीपुढे हजर करून तिच्या पुनर्वसनाची कारवाई करण्यात येत आहे.

सभागृहचालकाला दिल्या मौखिक सूचना 
- यावेळी सभागृह चालकाला विवाह सोहळ्यासाठी सभागृह देताना वर आणि वधू या दोघांचे आधार कार्ड, वयाचा दाखला घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. असे न केल्यास सभागृहचालक, केटरिंगचालक, फोटोग्राफर आदींवर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार असल्याच्या सूचना यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी दिल्या.

जन्म दाखल्यावरून कळले मुलीचे वय 

- बॅचलर रोडवर असलेल्या सभागृहात बालविवाह पार पडत असल्याचे समजताच चाईल्ड लाईनचे जिल्हा समन्वयक आशिष मोडक यांनी सभागृहात धाव घेत लग्नसोहळ्याची पत्रिका प्राप्त केली. दरम्यान, मुलगी कोणत्या शाळेत शिकत होती, याची माहिती घेऊन तेथील शाळेशी संपर्क करून मुलीच्या जन्माचा दाखला प्राप्त करण्यात आला. दरम्यान, दाखल्यात मुलीचे वय अवघे १६ वर्षे असल्याचे समजले. त्यानंतरच हा बालविवाह रोखण्यात आला.
 

 

Web Title: Child line stops child marriage in Wardha!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.