अल्पवयीन नववधूकरिता आली मंत्रालयातील पोलीस शिपायाची वरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2021 10:33 AM2021-12-31T10:33:07+5:302021-12-31T10:55:01+5:30

मंत्रालयातील पोलीस शिपायाचा विवाह समुद्रपूर तालुक्यातील मुलीशी ठरला होता. नववधू अल्पवयीन असल्याची माहिती मिळताच बाल कल्याण समितीने घटनास्थळी जाऊन हा बालविवाह (child marriage) रोखला.

Child Welfare Committee stopped marriage of a minor girl in wardha | अल्पवयीन नववधूकरिता आली मंत्रालयातील पोलीस शिपायाची वरात

अल्पवयीन नववधूकरिता आली मंत्रालयातील पोलीस शिपायाची वरात

Next
ठळक मुद्देसमितीने रोखला बालविवाह समुद्रपूर तालुक्यातील घटनापोलिसात अद्याप तक्रार नाही

वर्धा : मुंबई येथील मंत्रालयात पोलीस शिपायी असलेला मुलगा समुद्रपूर तालुक्यातील एका गावात वरात घेऊन आला. पण, नववधू अल्पवयीन (Minor) असल्याची माहिती मिळताच बाल कल्याण समितीने (child welfare committee wardha) घटनास्थळी जाऊन बालविवाह (child marriage) रोखला. परिणामी मोठ्या अपेक्षेने आलेल्या या मुंबईच्या नवरोबाला आल्या पावलीच माघारी जावे लागले.

मंत्रालयातील पोलीस शिपायाचा विवाह समुद्रपूर तालुक्यातील मुलीशी ठरला होता. हा विवाह २४ डिसेंबरला होणार असल्याची माहिती जिल्हा महिला व बालविकास विभागाला मिळताच बाल कल्याण कल्याण समितीने(CWC) गाव गाठून विवाह थांबविला. मुलगा, मुलगी, त्यांचे आईवडील व नातेवाईकाना समितीसमोर हजर करण्यात आले. यावेळी बालकल्याण समितीचे अध्यक्ष सचिन आष्टीकर, अलका भुगूल, रेखा भोयर व इतर बालकल्याण समितीचे सदस्य आणि जिल्हा बाल संरक्षण अधिकारी माधुरी भोयर, संरक्षण अधिकारी महेश कामडी, सामाजिक कार्यकर्ता मेघा तामगिरे, चाईल्ड लाईनचे जिल्हा समन्वयक आशिष मोडक, सहायक पोलीस निरीक्षक मसराम, ग्रामसेवक दिनेश चांदेवर, सरपंच बलराम राऊत आणि गावातील प्रतिष्ठित नागरिकांची उपस्थितीत ग्रामसेवकांना पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते. पण, चार दिवसांचा कालावधी लोटला, तरीही ग्रामसेवकाने यासंदर्भात कोणतीही तक्रार दिली नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. नवरोबाच पोलीस खात्यात असल्याने हे प्रकरण दडपण्यासाठी तर प्रयत्न होत नाही ना? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

मंत्रालयातील पोलीस शिपायाचा विवाह समुद्रपूर तालुक्यातील गावामध्ये होणार होता. मुलगी अल्पवयीन असल्याने हा बालविवाह रोखण्यात आला. त्यासंदर्भात बाल विवाह प्रतिबंधक अधिकारी असलेले ग्रामसेवक यांना पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर काय झाले याची माहिती घेतली जाईल.

प्रशांत विधाते, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी

काय ते समितीनेच करावे : ग्रामसेवक

मुलीच्या जन्माचा दाखल कुणाकडेही उपलब्ध नाही. त्यामुळे वैद्यकीय तपासणी करून ती कमी वयाची असल्याचा दाखल मागितला होता. पण, तो मला मिळाला नसल्याने मी तक्रार केली नाही. माझ्या माहितीप्रमाणे उद्या ती १८ वर्षाची होणार आहे, अशी माहिती आहे. मी या विवाह समारंभातही सहभागी नव्हतो. आता काय ते समितीनेच करावे, असे उत्तर ग्रामसेवकाने दिले.

Web Title: Child Welfare Committee stopped marriage of a minor girl in wardha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.