१२ व १३ डिसेंबरला वर्ध्यात बाल साहित्य संमेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2019 12:26 PM2019-11-28T12:26:44+5:302019-11-28T12:27:09+5:30

विदर्भ साहित्य संघाचे ६ वे बाल साहित्य संमेलन १२ व १३ डिसेंबरला सावंगी (मेघे) येथील दत्ता मेघे सभागृहात आयोजित करण्यात आले आहे.

Children's Literature Meeting in Wardha on 12 th and 13 th December | १२ व १३ डिसेंबरला वर्ध्यात बाल साहित्य संमेलन

१२ व १३ डिसेंबरला वर्ध्यात बाल साहित्य संमेलन

Next
ठळक मुद्देविदर्भ साहित्य संघ व एसओएसचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती वर्षानिमित्त विदर्भ साहित्य संघ शाखा वर्धा आणि स्कूल आॅफ स्कॉलर्स यांच्या संयुक्त विद्यमाने विदर्भ साहित्य संघाचे ६ वे बाल साहित्य संमेलन १२ व १३ डिसेंबरला सावंगी (मेघे) येथील दत्ता मेघे सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. या परिसराला मॉ-बापू साहित्यनगरी असे नाव देण्यात आले असून येथील आचार्य विनोबा भावे विचारपीठावर बालकांना अभिव्यक्त होण्याची संधी मिळणार असल्याची माहिती स्वागताध्यक्ष आभा मेघे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ख्यातनाम चित्रकार चंद्रकांत चन्ने तर उद्घाटक म्हणून प्रसिद्ध नाट्य व सिनेकलावंत चिन्मय मांडलेकर यांची उपस्थिती राहणार आहे. गुरुवार १२ डिसेंबरला सकाळी ९ वाजता ग्रंथदिंडीने या संमेलनाची सुरुवात होणार आहे. शहरातील लोक विद्यालयातून निघणाऱ्या या दिंडीमध्ये शालेय विद्यार्थी व साहित्यिक सहभागी होणार असून महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ समारोप होईल. त्यानंतर सावंगी येथील मॉ-बापू साहित्यनगरीमध्ये सकाळी ११ वाजता संमेलनाचे उद्घाटन होईल. या संमेलनामध्ये आयोजित सर्व कार्यक्रमांना महात्मा गांधीजींवर आधारीत थिम देण्यात आल्याने बाल कलाकरांच्या उपस्थितीत बापूंचा जीवनपट उलगडला जाणार आहे. विदर्भातील विद्यार्थी या संमेलनात सहभागी होणार असल्याने वर्धेकरांना दोन दिवस बाल साहित्यिकांच्या सहवास लाभणार आहे, असेही यावेळी सांगण्यात आले. सावंगी येथे आयोजित पत्रकार परिषदेला संमेलनाच्या निमंत्रक शुभदा फडणवीस, विदर्भ साहित्य संघाच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सरचिटणीस विलास मानेकर, शाखा समन्वय प्रदीप दाते, वर्धा शाखेचे अध्यक्ष संजय इंगळे तिगावकर व स्कूल आॅफ स्कॉलरच्या प्राचार्य आरती चौबे व मराठी विभाग प्रमुख अमित इंगोले उपस्थित होते.

बालकांच्या साहित्यासोबतच समस्याही जाणणार
वाचन चळवळ वृद्धींगत करण्यासोबतच साहित्याची ओढ व जाण निर्माण करणे हा या संमेलनाचा उद्देश आहे. विद्यार्थ्यांच्या साहित्यासोबतच त्यांच्या समस्यांही जाणून घेण्याचा प्रयत्न या संमेलनाच्या माध्यमातून केला जाणार आहे..
संमेलनामध्ये उद्घाटनानंतर जिल्ह्यातील प्रतिभावंताचा सन्मान केल्यानंतर दुपारी १२.३० वाजता सना पंडीत चिन्मय मांडलेकर यांची प्रकट मुलाखत घेतील. दुपारी २ वाजता महात्मा गांधी यांच्या जीवनावर आधारीत नाटीका सादर होईल तर दुपारी ३.३० वाजता सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
१३ डिसेंबरला सकाळी १० वाजता कविसंमेलन, ११.३० वाजता बालसाहित्यिकांचे अभिजात कथावाचन होईल. दुपारी २ वाजता अभिरुप न्यायालय या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी, पालक व शिक्षक आपापली बाजू मांडून न्यायाधीश न्याय देतील. न्यायाधीशाची भूमिका ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुनीती देव बजावतील.
संमेलनाच्या समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चंद्रकांत चन्ने तर प्रमुख अतिथी म्हणून युवा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक समील सरदार मुल्ला (कोल्हापूर) उपस्थित राहतील. या संमेलनाला विद्यार्थी, पालक व शिक्षकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

Web Title: Children's Literature Meeting in Wardha on 12 th and 13 th December

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.