शीतलहरींनी जिल्ह्यात गारठा
By admin | Published: January 15, 2017 12:44 AM2017-01-15T00:44:49+5:302017-01-15T00:44:49+5:30
आॅक्टोबर ते जानेवारी हा कालावधी साधारणत: हिवाळ्याचा मानला जातो. यातील डिसेंबरमध्ये कडाक्याची थंडी पडून
पारा ८ अंशांखाली जाण्याचा अंदाज : कमाल तापमानातही होतेय घट
श्रेया केने वर्धा
आॅक्टोबर ते जानेवारी हा कालावधी साधारणत: हिवाळ्याचा मानला जातो. यातील डिसेंबरमध्ये कडाक्याची थंडी पडून जानेवारी मध्यापर्यंत हुडहुडी कमी होते; पण यंदा उत्तरेकडे वाहणाऱ्या शीतलहरी आणि बर्फवृष्टीमुळे जिल्हा गारठणार असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. सध्या जिल्ह्यात पारा ९ अंशांपर्यंत घसरला आहे. आणखी चार-पाच दिवस हुडहुडी भरणारी थंडी पडणार असून पारा ७-८ अंशांपर्यंत घसरेल, असा अंदाजही वर्तविला जात आहे.
जानेवारी महिन्यातील मकरसंक्रांतीनंतर थंडीचा जोर कमी होतो. नोव्हेंबर आणि डिसेंबर हे दोन महिने कडाक्याच्या थंडीचे मानले जातात; पण यंदा या दोन्ही महिन्यात विशेष थंडी जाणवली नाही. डिसेंबर महिन्यात काही प्रमाणात पारा घसरला होता. साधरण १२ ते १० अंशांपर्यंत पारा घसरला होती. काही दिवस ९.५ अंशांवर पारा घसरला होता. यानंतर ढगाळ वातावरणामुळे पुन्हा थंडीचा जोर कमी झाला. जानेवारी महिन्याच्या प्रारंभी विशेष थंडी नसल्याने हिवाळा संपला तर नाही ना, अशी भीतीही व्यक्त होत होती; पण ही भीती व्यर्थ ठरली. जानेवारी महिन्याच्या दहा दिवसांनंतर थंडीचा जोर आणखी वाढला. १०-११ अंशांपर्यंत गेलेला पारा पुन्हा कमी झाला. काल-परवापर्यंत ९ अंशांपर्यंत पारा खाली आला आहे. शिवाय कमाल तापमानातही घट होत असल्याने दिवसभर हुडहुडी भरविणारी थंडी जाणवत आहे. सर्व ऋतूमध्ये वर्धा जिल्ह्यातील साधारण तापमान ३० ते ३५ अंशांपर्यंत असते; पण यंदा कमाल तापमानही मोठ्या प्रमाणात घसरले. पारा २५ अंशांपर्यंत घसरल्याने दिवसभर थंडी जाणवत असल्याचे दिसते. कमाल आणि किमान दोन्ही तापमानामध्ये घसरण होत असल्याने जिल्हा गारठत असल्याचेच चित्र आहे.
या हुडहुडी भरविणाऱ्या थंडीचा नागरिक, पर्यटक आनंद लुटत असून पिकांनाही काही प्रमाणात फायदा होत असल्याचे दिसते. रबी हंगामातील गहू, चणा पिकांना या गुलाबी थंडीचा फायदा होत असल्याचे दिसून येत आहे. दोन्ही पिके जोमात असून उत्पादनात वाढ होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. असे असले तरी तूर पिकाला १० अंशांच्या खाली गेलेल्या पाऱ्यामुळे नुकसान होण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.
कमाल तापमानातही घट
ऋतू कोणताही असला तरी वर्धा जिल्ह्यातील तापमान ३० ते ३५ अंशांपर्यंत नोंदले गेले आहे; पण यंदा कमाल तापमानातही कमालीची घट होत आहे. शुक्रवारी कमाल तापमान २५ अंशांपर्यंत खाली आले होते. या तापमानातही आणखी घट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
पारा आणखी घसरणार
उत्तरेकडे सध्या शीतलहर सुरू आहे. उत्तरेकडील राज्यांमध्ये होत असलेल्या बर्फवृष्टीचा परिणामही जिल्ह्यावर होत असल्याचे सांगण्यात येते. सध्या ९ अंशांपर्यंत घसरलेला पारा ७ ते ८ अंशांपर्यंत घसरण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. यामुळे थंडीचा कालावधीही आणखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
वातावरणातील आर्द्रता घटत असल्याने जानेवारी महिन्यातही थंडीचा जोर वाढत असल्याचे सांगण्यात आले आहे. ही थंडी आणखी चार ते पाच दिवस राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. हुडहुडी भरविणारी ही थंडी नागरिकांना सुखावणारी ठरणार आहे.