अन्यायाविरूद्ध चिमुकल्यांनी काढला निषेध मोर्चा
By admin | Published: June 7, 2017 12:34 AM2017-06-07T00:34:37+5:302017-06-07T00:34:37+5:30
जिल्ह्यात अतिप्रसंग व विनयभंगाच्या घटना सातत्याने घडत आहेत. यामुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलीस अधीक्षकांना निवेदन : मुलींवर अतिप्रसंग करणाऱ्यांना कठोर शिक्षा द्या
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यात अतिप्रसंग व विनयभंगाच्या घटना सातत्याने घडत आहेत. यामुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनांना आळा घालून दोषींना कठोर शिक्षा करावी, या मागणीसाठी १० ते १२ वयोगटातील मुलींनी झलकारी सेनेच्या नेतृत्वात निषेध मोर्चा काढला. यावेळी पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस. यांना निवेदन देण्यात आले.
मागील महिन्यात जिल्ह्यात अनेक ठिकाणी लहान मुलींवर व महिलांवर अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत. शहरात बरबडी, गोरक्षण वॉर्ड व तारफैल आदी ठिकाणी नराधमांनी चिमुकलींवर बळजबरीने अत्याचार केला. गंभीर घटना घडूनही नागरिक पेटून उठत नाही, ही आश्चर्याची बाब आहे. यामुळे आम्ही महिलांनी एकत्रित येऊन झलकारी सेना संघटनेची स्थापना केली आहे. या संघटनेमार्फत आम्ही गोरगरीब पीडितांना न्याय मिळवून देण्याकरिता लढा उभारणार आहोत. अत्याचारांच्या घटनांच्या विरोधात सोमवारी बजाज चोक येथून निषेध मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात दहा ते बारा वयोगटातील शेकडो मुलींचा सहभाग होता.
या चिमुकल्या मुलींनी पोलीस काका आम्हाला सुरक्षा द्या, पोलीस मामा आम्हाला सुरक्षा द्या, पोलीस काकू आम्हाला सुरक्षा द्या, आदी फलके हातात घेऊन घोषणा देत सुरक्षेची मागणी केली. हा मोर्चा बजाज चौक, जिल्हा सामान्य रुग्णालय मार्गाने पोलीस अधीक्षक कार्यालयावर पोहोचला. यावेळी पीडित मुलींना न्याय मिळवून देऊन दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पोलीस अधीक्षकांना निवेदनातून केली आहे.
निवेदन देताना संघटनेच्या अध्यक्ष स्मिता नगराळे, सचिव जया मोटघरे, उपाध्यक्ष सुप्रिया कांबळे, कार्याध्यक्ष अर्चना ताकसांडे, सचिव माधुरी फुलमाळी, ज्योती जायदे, प्रज्ञा चांदणे, पूजा भगत, प्राची नगराळे, राणी मेश्राम, उज्वला रामटेके, शैला कांबळे, यांच्यासह शेकडो मुलींचा सहभाग होता.
मोर्चाने वेधले नागरिकांचे लक्ष
शहरातील बजाज चौकातून निघालेल्या चिमुकल्यांच्या मोर्चाने नागरिकांचेही लक्ष वेधून घेतले होते. बजाज चौक ते पोलीस अधीक्षक कार्यालयापर्यंत जाणारा हा मोर्चा व सहभागी चिमुकल्यांच्या हातातील फलक आकर्षण ठरले होते. पोलीस अधीक्षक कार्यालयात पोहोचल्यानंतर एसपी निर्मलादेवी यांनीही चिमुकल्यांची आस्थेने विचारपूस करीत निवेदन स्वीकारले व सुरक्षेची ग्वाही दिली.