चोंडी शिवारात रंगली चक्क ‘काळविट’च्या मांसाची पार्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2021 05:00 AM2021-12-19T05:00:00+5:302021-12-19T05:00:20+5:30
शुक्रवारी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास देवळी तालुक्यातील चोंडी शिवार गाठून काळविटाच्या मांसाची मेजवानी करीत असलेल्या विश्वेश्वर हरिभाऊ सोनटक्के, नागसिंग संजय वाघमारे, रंजित जगदीश टामठे व सुरेंद्र लक्ष्मण दांढेकर, सर्व रा. चोंडी यांना ताब्यात घेत अटक केली. या चारही आरोपींना अटक करून वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पुलगाव येथील न्यायालयात हजर केले असता या चारही आरोपींना सात दिवसांची वनकोठडी ठोठावली आहे. तर फरार असलेल्या आरोपींचा शोध सध्या घेतला जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : देवळी तालुक्यातील भिडीनजीकच्या चाेंडी शिवारात थेट काळविटाची शिकार करून त्याच्या मांसाची मेजवानी केली जात असल्याची माहिती मिळताच वर्धा वनविभागाने धडक कारवाई करून चौघांना ताब्यात घेतले. या आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांच्याकडून काळविटाची कातडी व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.
वन्यजीवांची शिकार करणे हे कायद्यान्वये गुन्हा आहे. असे असले तरी देवळी तालुक्यातील चोंडी शिवारात अवैधपणे काळविटाची शिकार करून काळविटाच्या मांसची मेजवानी केली जात असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी रूपेश खेडकर यांना मिळाली. त्यानंतर वर्धा वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी रूपेश खेडकर, माधव माने, सारंग कोठेवार, अशपाक पठाण, प्रशांत कमिटी व कुकडे यांच्या चमूने शुक्रवारी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास देवळी तालुक्यातील चोंडी शिवार गाठून काळविटाच्या मांसाची मेजवानी करीत असलेल्या विश्वेश्वर हरिभाऊ सोनटक्के, नागसिंग संजय वाघमारे, रंजित जगदीश टामठे व सुरेंद्र लक्ष्मण दांढेकर, सर्व रा. चोंडी यांना ताब्यात घेत अटक केली. या चारही आरोपींना अटक करून वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पुलगाव येथील न्यायालयात हजर केले असता या चारही आरोपींना सात दिवसांची वनकोठडी ठोठावली आहे. तर फरार असलेल्या आरोपींचा शोध सध्या घेतला जात आहे.
मुख्य सूत्रधार ‘विनोद’चा घेतला जातोय शोध
- या प्रकरणात आणखी काही आरोपी वाढण्याची शक्यता असून अटकेतील आरोपींच्या कबुली जबाबावरून विनोद नामक एक व्यक्ती या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार असल्याचे वनविभागाच्या आतापर्यंतच्या चौकशीत पुढे आले आहे. त्यामुळे विनोद नामक फरार आरोपीचा वनविभगााच्या अधिकाऱ्यांकडून युद्धपातळीवर शोध घेतला जात आहे. पण शनिवारी सायंकाळपर्यंत यश आले नव्हते.
मृत काळवीट मादीच
- वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी अटकेतील आरोपींकडून शिकार केलेल्या काळविटाची कातडी, नायलॉनचे तीन जाळे, काळविटाचे तुकडे करण्यासाठी वापरण्यात आलेले सतूर, कुऱ्हाड व विविध साहित्य तसेच काळविटाच्या मांसाची शिजविलेली भाजी व स्टिलचा डबा आदी साहित्य जप्त केले आहे.
तळणी शिवारातील शेतात झाली हिस्सेवाटणी
- शिकार केलेल्या काळविटाची आरोपींनी तळणी (खं.) येथील अनिल लक्ष्मण थूल यांच्या मालकीच्या शेतात हिस्सेवाटणी केली. त्यानंतर याच मांसाची मेजवानी करीत असताना चार आरोपींना वनविभागाच्या चमूने रंगेहात ताब्यात घेत अटक केली आहे.
गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई करून काळविटाच्या मांसाची मेजवानी करणाऱ्या चौघांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात आराेपी वाढण्याची शक्यता असून फरार असलेल्या विनोद नामक व्यक्तीचा शोध घेतला जात आहे. वन्यजीवांची शिकार करणे हे कायद्यान्वे गुन्हा आहे, हे नागरिकांनी लक्षात घेतले पाहिजे.
- रूपेश खेडकर, वनपरिक्षेत्र अधिकारी, वर्धा.