जीर्ण पं.स. इमारतीचा कायापालट होणार काय?
By admin | Published: March 6, 2017 01:05 AM2017-03-06T01:05:12+5:302017-03-06T01:05:12+5:30
विद्यमान पं.स. पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ १४ मार्च रोजी संपणार आहे. नवनिर्वाचित सदस्य पं.स.चा कार्यभार सांभाळणार आहे.
नागरिकांचा सवाल : कित्येक सभापती, अधिकारी बदलले; पण दुरवस्था कायमच
सेलू : विद्यमान पं.स. पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ १४ मार्च रोजी संपणार आहे. नवनिर्वाचित सदस्य पं.स.चा कार्यभार सांभाळणार आहे. या पाच वर्षांच्या काळात तरी पं.स. च्या जीर्ण इमारतीचा कायापालट होणार काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
७ सप्टेंबर १९६२ रोजी सेलू पंचायत समितीचे पहिले सभापती म्हणून अमृत सिताराम काटकर यांनी पदभार सांभाळला होता. तेव्हा येथे इमारत, विभागवार कार्यालये आणि कर्मचारी वसाहत होता. आज याला ५५ वर्षे होत आहेत. ५५ वर्षांच्या कालावधीत १४ व्यक्तींनी सभापतीपद भूषविले. दरम्यानच्या काळात कार्यालयाची इमारत जीर्ण झाली. कर्मचारी वसाहत तर अस्तित्वातच राहिली नाही. ज्या मुख्य इमारतीत गटविकास अधिकारी, सामान्य प्रशासन विभाग, लेखा, कृषी व पंचायत विभाग आहे, त्या इमारतीच्या छतावर बारमाही ताडपत्रीचे पांघरून घालावे लागते. पशुसंवर्धन, शिक्षण आणि एकात्मिक बाल विकास प्रकल्पाचे कार्यालय असलेल्या इमारतीला तडे गेले आहेत. हे चित्र इमारत जीर्ण झाल्याचे सांगते.
सभापती, उपसभापतीकरिता असलेला कक्ष पाहता राजकीयदृष्ट्या जिल्ह्यात दबदबा असलेल्या पदाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष कसे, असा प्रश्न सामान्यांना पडणे स्वाभाविक आहे.
पंचायत समितीच्या जीर्ण झालेल्या इमारतीच्या दुरूस्ती, नवीन इमारत याबाबत अनेकदा प्रस्ताव पाठविण्यात आले. येथील तहसील कार्यालयाला नवीन इमारत मिळत आहे; पण पं.स. इमारतीचे भिजत घोंगडे कायमच आहे. याबाबत शासनदरबारी पाठपुरावाही करण्यात आला; पण दाद मिळत नसल्याचेच दिसून येत आहे. आजपर्यंतच्या सभापती, अधिकारी व पदाधिकाऱ्यांना पं.स. कार्यालयासाठी नवीन इमारत मिळविता आली नाही. आता नव्याने निवडून आलेले पदाधिकारी येथील पं.स.च्या जीर्ण इमारतीचा कायापालट करून नवीन इमारतीसाठी पुढाकार घेणार काय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.(शहर प्रतिनिधी)
महत्त्वाची कार्यालये असलेल्या बहुतांश इमारतींची दुरवस्था
सेलू हा राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा आणि संवेदनशिल तथा राजकीय वजन असलेला तालुका मानला जातो. यामुळे येथील प्रशासकीय यंत्रणा सक्षम व सुसज्ज असावी, अशी अपेक्षा असते; पण ही अपेक्षा फोलच ठरताना दिसते. सेलू शहरातील बहुतांश शासकीय कार्यालयांच्या इमारतींची दुरवस्था झाल्याचेच पाहावयास मिळते. पंचायत समितीच्या इमारतीला तर वारंवार डागडुजी करावी लागते. अनेक ठिकाणी भिंतींना तडे गेले असून पावसाळ्यात कार्यालयात बसणेही कठीण होते. यामुळे नवीन पदाधिकारी व अधिकाऱ्यांकडून नवीन इमारतीची अपेक्षा केली जात आहे.