घराणेशाही-सहानुभूतीमुळे चुरस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 11:35 PM2019-06-21T23:35:13+5:302019-06-21T23:36:04+5:30
सेलू तालुक्यात होत असलेल्या झडशी जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीकडे राजकीय तज्ज्ञांचे लक्ष लागले आहे. ही निवडणूक घराणेशाही कि सहानुभुती अशी होत असल्याने येथे चुरस निर्माण झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
घोराड : सेलू तालुक्यात होत असलेल्या झडशी जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीकडे राजकीय तज्ज्ञांचे लक्ष लागले आहे. ही निवडणूक घराणेशाही कि सहानुभुती अशी होत असल्याने येथे चुरस निर्माण झाली आहे.
जिल्हा परीषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत या क्षेत्रातून विवेक हळदे हे काँग्रेसच्या चिन्हावर भरघोस मतांनी विजयी झाले होते. झडशी क्षेत्राच्या विकासासाठी धडपडणाऱ्या विवेक हळदे यांचे हृदय विकाराच्या धक्याने निधन झाले. त्यामुळे येथील जागा रिक्त झाली. त्याच जागेसाठी २३ रोजी पोटनिवडणूक होऊ घातली आहे. ही निवडणूक अविरोध होईल, असा अंदाज मतदार व्यक्त करीत असताना सहा उमेदवारांनी निवडणूक रिंगणात उडी घेतली. यात काँग्रेसकडून सौरभ शेळके, राष्ट्रवादी काँग्रेसकडून भागत साबळे, भा.ज.पा.चे भुषण पारटकर, बसपाचे अरूण शंभरकर तर अपक्ष म्हणून विलास राऊत व रोषण राऊत राजकीय भविष्य आजमावत आहे. नुकत्याच झालेल्या ग्रा.पं. निवडणुकीत झडशी ग्रा.पं.मध्ये विवेक हळदे यांच्या पत्नीला मतदारांनी बहूमताचा कौल देत सरपंचपदी विराजमान केले.
त्यामुळे या कुटूंबातून जि. प. निवडणुकीकरिता उमेदवार दिला नाही. तर टाकळी येथील ग्रा.पं.ची सत्ता हातात घेणाऱ्यांना जि.प.पोटनिवडणुकीचा मोह आवळता आला नसल्याची चर्चा परिसरात होत आहे. तालुक्यात काँग्रेसचे शेखर शेंडे व पप्पु जयस्वाल असे दोन गट असले तरी. नुकत्याच पार पडलेल्या ग्रा.पं.निवडणुकीत ते एकजूट असल्याचे चित्र बघावयास मिळाले. यामुळे याही पोटनिवडणुकीत काँग्रेस चमकेल काय याकडे साºयांचे लक्ष लागले आहे. तर भा.ज.पा.मध्ये उमेदवाराकरिता अनेक दावेदार असताना स्थानिक नेत्याने आपल्याच नातेवाईकास उमेदवारी दिल्याच्या कारणाने भाजपा कार्यकर्त्यात एकजुट नसल्याची चर्चा होत आहे. ही निवडणूक तिहेरी होईल, असा अंदाज नागरिकांकडून वर्तविला जात असून विवेक हळदे यांच्या निधनामुळे सहानुभूतीची लाटही या भागात असल्याचे बोलले जात आहे. परंतु, प्रत्यक्ष मतदान होऊन मतमोजणी झाल्यावरच विजयाची माळ कुणाच्या गळ्यात पडेल हे स्पष्ट होणार आहे.
काँग्रेसचा गड
मतदार कुणाच्या बाजूने बहुमताचा कौल देतात हे निवडणूक निकाला नंतर स्पष्ट होणार आहे. झडशी जि.प. क्षेत्राकडे दिवंगत आमदार प्रमोद शेंडे यांचे विशेष लक्ष राहात असे. त्यामुळे हा काँग्रेसचा गड मानला जातो. या निवडणुकीत मतदार गड कायम ठेवणार काय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.