सिनेस्टाईल पाठलाग करुन तोतया पोलिसांना ठोकल्या बेड्या, आंतरराज्यीय टोळी जाळ्यात
By आनंद इंगोले | Published: October 4, 2023 05:39 PM2023-10-04T17:39:50+5:302023-10-04T17:41:27+5:30
महामार्गावर वृद्धांची करायचे लुटमारी
वर्धा : महामार्गावर पोलिस असल्याची बतावणी करुन वृद्धांची लुटमार करण्याच्या घटना वाढत असल्याने पोसिलांनी तपासाला गती दिली. यादरम्यान समुद्रपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कानकाडी शिवारात दोन व्यक्ती संशयास्पदरित्या दिसून आले. पोलिस दिसताच त्यांनी धूम ठोकल्याने पोलिसांनी सिनेस्टाईल या तोतया पोलिसांचा पाठलाग करुन अटक केली.
इमरान परवेज जाफरी रा. चिंद्री रोड जि.बिदर-कर्नाटक, हल्ली मुक्काम भानपूर जि. भोपाळ व तमस बिजय सूर्यवंशी रा. भानपूर जि. भोपाळ, असे अटक करण्यात आलेल्या तोतया पोलिसांची नावे आहे. वर्धा जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील महामार्गावर काही महिन्यांपासून दोन व्यक्ती पोलिस असल्याची बतावणी करुन दुचाकीने प्रवास करीत असलेल्या वृद्धांजवळील दागिणे पळवित असल्याच्या घटना घडत होत्या. याप्रकरणी समुद्रपूर पोलिसांतही गुन्हा दाखल झाला होता. समुद्रपूरचे ठाणेदार संतोष शेगावकर यांनी गुन्हे अन्वेषण पथकाला तपासाकरिता रवाना केले. यादरम्यान या पथकाला दोन व्यक्ती कानकाटी शिवारात संशयास्पद आढळून आल्याने त्यांचा पाठलाग करुन ताब्यात घेतले.
चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून ए.पी.३९ एफ.एस.६५७४ क्रमांकाची दुचाकी व मोबाईल असा एकूण १ लाख १० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. या आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. ही कारवाई पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक डॉ. सागर कवडे, उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडीत यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक संतोष शेगावकर यांच्या निर्देशावरुन अरविंद येनुरकर, रविी पुरोहीत, राजेश शेंडे, सचिन भारशंकर, वैभव चरडे यांनी केली.
याही भागात केली लुटमारी
अटकेतील दोन्ही आरोपींनी वर्धा जिल्ह्यातील देवळी, सेलू, सावंगी, वडनेर, हिंगणघाट, सिंदी (रेल्वे) या पोलिस ठाण्यांच्या हद्दीसह नागपूर जिल्ह्यातील रामटेक, उमरेड, भिवापूर, काटोल तसेच कर्नाटक राज्यात बिदर जिल्हा व मध्यप्रदेश भोपालमध्ये सुध्दा अशा प्रकारचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. त्यामुळे आता या आरोपींना या सर्व पोलिस ठाण्यांमध्ये मुक्काम करावा लागणार आहे.