खंडित वीज पुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त
By Admin | Published: April 10, 2015 01:40 AM2015-04-10T01:40:05+5:302015-04-10T01:40:05+5:30
सध्या एप्रिल महिन्यातच सूर्य आग ओकू लागला आहे़ उन्हाची तीव्रता वाढत असल्याने सर्वत्र कुलर सुरू झालेत़ यातच महावितरणची हेकेखोरीही सुरू झाली आहे़ ...
पुलगाव : सध्या एप्रिल महिन्यातच सूर्य आग ओकू लागला आहे़ उन्हाची तीव्रता वाढत असल्याने सर्वत्र कुलर सुरू झालेत़ यातच महावितरणची हेकेखोरीही सुरू झाली आहे़ वेळी-अवेळी वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत़ वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी होत आहे़
दुपारचे रखरखते उन्ह पाहता शहरातील रस्ते ओस पडत आहे़ जनावरेही अंगाची काहिली होत असल्याने नाल्यांतील ओलसरपणा, झाडाच्या सावलीचा आधार घेतात़ उन्हाची तीव्रता व गर्मी वाढल्याने प्रत्येक घरी कुलर लागले आहे़ सामान्य माणूस कुलरच्या थंड हवेत आराम करताना दिसतो़ अशातच मागील काही महिन्यांपासून वीज वितरण कंपनीकडून वेळी-अवेळी वीज पुरवठा खंडित केला जात आहे़ यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. कुठलेही नियोजित भारनियमन नाही. त्याबाबत कुठलीही सूचना देण्यात आलेली नाही; पण दिवसभरात काही वेळेच्या अंतराने वीज पुरवठा खंडित केला जात आहे. आधीच उन्हाचे चटके आणि खंडित वीज पुरवठा यामुळे रुग्णांसह सामान्य नागरिक कमालीचा हैराण आहे. पाच-पाच मिनिटांनी खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे विजेच्या उपकरणांवरही विपरित परिणाम होत आहे़
सध्या शालेय परीक्षा सुरू आहेत. खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे परीक्षा देताना विद्यार्थ्यांची मानसिकता विचलित होत असल्याची ओरड होत आहे़ उन्हाळ्यातच वीज पुरवठा खंडित होत असल्याने एकूण कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे़ वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत विजेचा खेळखंडोबा तवरित बंद करावा आणि सुरळीत वीज पुरवठा करावा, अशी मागणी नागरिकांद्वारे करण्यात येत आहे़(तालुका प्रतिनिधी)