वाहतुकीच्या कोंडीने नागरिक त्रस्त
By admin | Published: May 14, 2017 12:54 AM2017-05-14T00:54:07+5:302017-05-14T00:54:07+5:30
खडकी येथे रस्त्याच्या कडेला चालक आपल्या ताब्यातील वाहने रस्त्याच्या मधोमध उभी करतात.
मोठ्या अपघाताची भीती : वाहतूक पोलीस नेमण्याची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
केळझर : खडकी येथे रस्त्याच्या कडेला चालक आपल्या ताब्यातील वाहने रस्त्याच्या मधोमध उभी करतात. परिणामी, येथे नेहमी वाहतुकीची कोंडी होते. हा प्रकार मोठ्या अपघाताला निमंत्रण देणारा ठरत आहे. येथे वाहतूक पोलिसांची नियुक्ती करावी, अशी मागणी आहे. मध्यंतरी एक वाहतूक पोलीस नेमण्यात आला होता; पण काही दिवसांपासून ते कर्तव्य बजावत नसल्याने वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे. यामुळे नागरिकांना मनस्ताप होत आहे.
शनिवारी सकाळी येथील संकटमोचन हनुमान मंदिराच्या अगदी समोर सीजी ०४ जेसी ६६५४ क्रमांकाचा ट्रेलर महामार्गावर नादुरूस्त झाल्याने उभा करण्यात आला होता. यामुळे वर्धा-नागपूरकडे जाणाऱ्या वाहनांच्या रांगा महामार्गाच्या दुतर्फा लागून वाहतुकीची काही तास कोंडी झाली होती. परिणामी, प्रवाशांना नामक मनस्ताप सहन करावा लागला.
मंदिर परिसरात रस्त्याच्या दुतर्फा व्यावसायिकांनी अतिक्रमण करून आपली दुकाने थाटली आहेत. यामुळे वाहनतळाकरिता जागा शिल्लक राहिली नाही. सदर अतिक्रमण काढावे, अशी मागणी अनेकदा नागरिकांनी संबंधित विभागाकडे केली; पण याकडे दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे येथे दर्शनाकरिता थांबा घेणारे प्रवासी त्यांची वाहने रस्त्यावर उभी करतात. यामुळे वाहतुकीची कोंडी होते. खडकी येथे वाहनतळाची निर्मिती करावी, अशी मागणी नागरिकांनी अनेकदा संबंधित विभागाकडे केली; पण अद्यापही कार्यवाही करण्यात आली नाही. प्रशासनाने याकडे लक्ष देत अतिक्रमण हटवावे व वाहनतळाची व्यवस्था करून वाहतुकीची समस्या निकाली काढावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
राज्यमार्गावरील रहदारीला होतो अडथळा, रात्रीचा धोका अधिक
नागपूर ते यवतमाळ हा राज्य मार्ग आहे. दरम्यान, खडकी हे प्रत्येक वाहन चालक व प्रवाशांकरिता थांब्याचे स्थळ झाले आहे. या मंदिरात पवनसुताचे दर्शन घेण्याकरिता प्रत्येक प्रवासी थांबतो. याचाच फायदा घेण्याकरिता रस्त्याच्या दोन्ही कडेला अतिक्रमण वाढले असून दुकाने थाटण्यात आली आहे. दुकाने आणि रस्त्यालगत उभी राहणारी वाहने, यामुळे राज्य मार्गावरील अवजड वाहनांना निमूळता रस्ता मिळतो. रात्रीच्या वेळी तर वाहने दिसत नसल्याने अपघाताचा धोका अधिक असतो. याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे.