नागरिकांनीच तोडले गतिरोधक
By admin | Published: September 23, 2016 02:29 AM2016-09-23T02:29:12+5:302016-09-23T02:29:12+5:30
शहरातील बहुतांश भागांत नागरिकांनी स्वत:च मनमर्जी गतिरोधक निर्माण केले आहेत.
प्रशासनाचे होते दुर्लक्ष : शहरातील अन्य भागांतही डोकेदुखी
वर्धा : शहरातील बहुतांश भागांत नागरिकांनी स्वत:च मनमर्जी गतिरोधक निर्माण केले आहेत. हे गतिरोधक वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत घातक ठरत होते. याबाबत तक्रारी करूनही उपयोग झाला नाही. अखेर शाक्य नगरातील संतप्त नागरिकांनी स्वत:च गतिरोधक खणून काढले. यामुळे वाहतुकीचा मार्ग प्रशस्त झाला आहे.
वर्धा-यवतमाळ रस्त्यालगत असलेल्या देवळी नाक्याजवळील सिंदी कॉलनी परिसरात प्रत्येक रस्त्यावर बेकायदेशीर गतिरोधक निर्माण करण्यात आले होते. याबाबत अनेकदा वर्धा नगर पालिकेला तसेच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदने देण्यात आलीत. या भागातील नगर सेवक रमन लालवानी यांच्याकडेही वारंवार तक्रारी केल्या; पण कुणीही कार्यवाही केली नाही. परिणामी, नागरिकांना ये-जा करताना प्रचंड यातना सहन कराव्या लागत होत्या. याबाबत वारंवार तक्रारी करूनही अनधिकृतरित्या बांधलेले गतिरोधक तोडण्यात आले नाही. उलट गतिरोधकांच्या संख्येत वाढ झाली.
या परिसरात एकूण ६१ अनधिकृत गतिरोधक आहेत. यापैकी काही गतिरोधक इतके उंच आहेत की, वाहनाने ये-जा करणाऱ्या नागरिकांना मानेचे आणि कंबरेचे आजार जडू लागले आहेत. गतिरोधकामुळे झटके लागत असल्याने वृद्ध आणि महिलांना वाहने चालविणे कठीण झाले. सदर अनधिकृत गतिरोधक तोडण्याबाबत पहिले निवेदन ५ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी, न.प. मुख्याधिकारी, न.प. अध्यक्षांना दिले. मुख्याधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांनी कार्यवाही करू, अशी ग्वाही दिली; पण कार्यवाही केली नाही. नगरसेवक रमन लालवानी यांनी, वाहनांचा वेग कमी व्हावा म्हणून बांधण्यात आले आहे, असे सांगितले. वास्तविक, रस्त्यावरून घरांमध्ये नळ जोडणी घेण्यात आली. पाईपला वाहनांमुळे नुकसान होऊ नये म्हणून परवानगी न घेता गतिरोधक बांधले. सात महिने कार्यवाही न झाल्याने शाक्यनगरच्या नागरिकांनी रविवारी काही गतिरोधक तोडले. आणखी अनधिकृत गतिरोधक कायम आहे. या उपक्रमात संजय जवादे, सिद्धार्थ आवळे, नाना बागडे, कुलदीप बनोदे, गौतम तुपसौंदर्य, अवी बन्सोड, दशरथ मोहिते, प्रमोद माहोरे, राजू मोडक, अमोल पाटील, संजय जंगले, सोहनिल तडसे, भीमराव कोसारे, निखील केसार आदींनी सहभाग घेतला.(कार्यालय प्रतिनिधी)