वनविभागाच्या ३० एकर जागेवर नागरिकांचा डल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2019 09:22 PM2019-08-11T21:22:46+5:302019-08-11T21:23:11+5:30

शहरानजीकच्या कारला भागातील वनविभागाच्या सुमारे ३० एकर जागेवर नागरिकांकडून अतिक्रमण करण्यात आले आहे. विशेष म्हणजे याच जागेवरून काही गौणखनिज माफियांनी माती व मुरूची चोरी केल्याचे बोलले जात आहे.

Citizens' bunches on 3 acres of forest area | वनविभागाच्या ३० एकर जागेवर नागरिकांचा डल्ला

वनविभागाच्या ३० एकर जागेवर नागरिकांचा डल्ला

Next
ठळक मुद्देअधिकारी कुंभकर्णी झोपेत : काहींनी केली मनमर्जीने गौणखनिजाची चोरी

महेश सायखेडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शहरानजीकच्या कारला भागातील वनविभागाच्या सुमारे ३० एकर जागेवर नागरिकांकडून अतिक्रमण करण्यात आले आहे. विशेष म्हणजे याच जागेवरून काही गौणखनिज माफियांनी माती व मुरूची चोरी केल्याचे बोलले जात आहे. असे असले तरी हे अतिक्रमण झटपट काढण्यासाठी तसेच उत्खनन माफियांवर कारवाई करण्यासाठी वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडून प्रभावी कारवाई करण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे वनविभागाचे अधिकारी कुंभकर्णी झोपेचे सोंग तर घेत नाही ना, असा सवाल सुजाण नागरिकांकडून विचारला जात आहे.
प्राप्त माहितीनुसार, मौजा कारला येथील सर्वे क्रमांक ९८ आराजी ३.६४ हेक्टर, सर्वे क्रमांक ९९ आराजी ७.९२ हेक्टर व सर्वे क्रमांक ०.७२ हेक्टर ही जागा महसूल विभागाने काही वर्षांपूर्वी वनविभागाकडे वळती केली. त्याची नोंदही महसूल विभागाने घेतली आहे. मात्र, जिल्ह्याचे स्थळ असलेल्या वर्धा शहराशेजारील याच वनविभागाच्या झुडपी जंगल जमिनीवर रामा राजू बागडे, महेंद्र मरजिवे, प्रेमिला प्रल्हाद उईके, सरिता रमेश उईके, लोकराम बाबूलाल बागडे, अनिता गजानन बास्टेकर, अर्चना राजेंद्र लाखे, हेमंत वडस्कर, प्रकाश गव्हारकर, प्रल्हाद गणपत उईके व आणखी ५८ च्यावर व्यक्तींनी अतिक्रमण केले आहे. पूर्वी या जागेवर झुडपी जंगल होते. परंतु, त्या परिसरातील अतिक्रमणधारकांसह काही अवैध वृक्ष कत्तल करणाऱ्यांनी सध्या येथील सागाचेही वृक्ष साफ केल्याचे दिसून येते.
इतकेच नव्हे, तर अतिक्रमण करून अनेकांनी त्या जागेवर पक्की घरे बांधली आहेत. तर काहींनी मोठ्या प्रमाणात उत्खनन केल्याचेही वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या पाहणीत पुढे आल्याचे खात्रीदायक सूत्रांनी सांगितले. असे असले तरी हे अतिक्रमण हटविण्यासाठी कुठलीही ठोस पावले वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांकडून उचलली जात नसल्याची चर्चा वनविभागाच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांमध्ये होत आहे. त्यामुळे वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

काहींचे खरेदी-विक्रीचे व्यवहार
वनविभागाच्या जागेवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले आहे. तशी नोंदही वनविभागाने घेतली आहे. परंतु, प्रभावी कारवाई करण्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे, याच वनविभागाच्या परिसरातील काही भूखंड काहींनी थेट विक्रीही केल्याचे वनविभागाच्या प्राथमिक चौकशीत पुढे आल्याचे नाव प्रकाशित न करण्याच्या अटीवर वनविभागाच्या कर्मचाºयाने सांगितले.

अतिक्रमण फोफावले; ग्रा.पं. चुप्पी साधून
मौजा कारला भागातील वनविभागाच्या जागेवर नागरिकांकडून केल्या जात असलेल्या अतिक्रमणात दिवसेंदिवस वाढ होत असताना ग्रा.पं. प्रशासनानेही चूप राहण्याचेच पसंत केले. त्यामुळे या अतिक्रमणाला कुठल्या राजकीय नेत्यासह एखाद्या मोठ्या भूखंड माफियाचे पाठबळ तर नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Web Title: Citizens' bunches on 3 acres of forest area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.