मृतदेहासह नागरिक शहर ठाण्यावर

By admin | Published: August 15, 2016 12:43 AM2016-08-15T00:43:20+5:302016-08-15T00:43:20+5:30

शहरातील तेलीपूरा परिसरात सकाळी कारच्या धडकेत बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झाला तर बालक जखमी झाला.

Citizens of the city along with the dead body | मृतदेहासह नागरिक शहर ठाण्यावर

मृतदेहासह नागरिक शहर ठाण्यावर

Next

कारच्या धडकेत बालिकेचा मृत्यू : बालकही गंभीर जखमी
वर्धा : शहरातील तेलीपूरा परिसरात सकाळी कारच्या धडकेत बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झाला तर बालक जखमी झाला. यात पोलिसांनी किरकोळ अपघाताचा गुन्हा नोंदविला. शिवाय चालकाला सायंकाळपर्यंत अटक केली नव्हती. परिणामी, बालिकेच्या माता-पित्यासह संतप्त गोंड प्लॉट येथील नागरिकांनी मृतदेहासह शहर ठाणे गाठले. आरोपी अटक होईपर्यंत मृतदेह उचलणार नाही, अशी भूमिका घेतल्याने तणाव निर्माण झाला होता.
याप्रसंगी पोलीस निरीक्षक राजेंद्र शिरतोडे व वरुण पाठक यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. यासाठी एक दिवसाचा कालावधी मागितला. शिवाय आरोपीलाही अटक करण्यात येणार असल्याची ग्वाही दिली. यावरून नागरिकांचे समाधान झाल्याने अंत्ययात्रा मोक्षधामाकडे वळती झाली. या घटनेमुळे शहर पोलीस ठाणे परिसरात वाहतूक ठप्प झाली होती. नागरिकांनी पोलिसांप्रती संताप व्यक्त करीत आरोपीच्या अटकेची मागणी लावून धरली. तत्पूर्वी शहर पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतल्याची माहिती दिली. यातील रूपेश नामक युवकाने आपणच गाडी चालवित होतो, अशी कबुली दिल्याची माहिती शहर पोलिसांनी दिली.
शहरातील तेलीपूरा परिसरात रविवारी सकाळी १०.३० च्या सुमारास कारच्या धडकेत एका दहा वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला तर तिचा भाऊ गंभीर जखमी झाला. पुष्पा विजय परतेकी (१०) रा. गोडप्लॉट असे मृतक चिमुकलीचे तर ललित परतेकी (१३) असे जखमी बालकाचे नाव आहे. नवभारत प्राथमिक अभ्यास शाळेची इयत्ता चौथीची विद्यार्थिनी पुष्पा परतेकी व तिचा भाऊ ललित हे तेलीपुरा येथे सायकलने फिरत होते. दरम्यान, एमएच २० सीएच २१७३ या क्रमांकाच्या कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने सायकलला जबर धडक बसली. या अपघातात दोघेही बहीण भाऊ गंभीर जखमी झाले. त्यांना त्वरित सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्यात आले; पण पुष्पाचा मृत्यू झाला होता. ललितवर उपचार सुरू असून त्याची प्रकृतीही गंभीर असल्याचे समजते.
सदर कार ही भरत अग्रवाल यांच्या मालकीची असून रूपेश नामक युवक ती चालवित होता. कारमध्ये आणखी तिघे होते, असे सीसीटीव्ही फुटेजवरून समोर आले आहे. सदर शुटींग स्पष्ट दिसत नसल्याने ते तपासण्यासाठी एक दिवस लागणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक शिरतोडे यांनी दिली.
या प्रकरणातील आरोपींना सोमवारी अटक न झाल्यास पुन्हा पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात येईल, असा इशाराही नागरिकांनी दिला.(कार्यालय प्रतिनिधी)

बसच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
बस आणि दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या धडकेत दुचाकी चालक जागीच ठार झाला. हा अपघात वर्धा-यवतमाळ मार्गावर खेमका मोटर्स सावंगी (मेघे) परिसरात रविवारी सकाळी ११.१५ वाजताच्या सुमारास घडला. मृतकाची ओळख अद्याप पटली नाही.
पोलीस सुत्रानुसार, एमएच ४० वाय ५२९८ क्रमांकाची बस नागपूर येथून उमरखेड येथे जात होती तर एमएच ३१ बीएक्स ९८५० या दुचाकीने एक इसम देवळी येथून वर्धेकडे येत होता. दरम्यान, खेमका मोटर्ससमोर बसची दुचाकीस्वाराला समोरासमोर धडक बसली. यात सदर दुचाकी चालक जागीच ठार झाला. याप्रकरणी बस चालक लखपती मनोहर आत्राम विरूद्ध सावंगी पोलीस ठाण्यात भादंविच्या कलम २७९, ३०४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पूढील तपास सावंगी पोलीस करीत आहे.
 

Web Title: Citizens of the city along with the dead body

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.