तपत्या उन्हात जिल्हाकचेरीत घोटभर थंड पाणी नागरिकांना मिळेना!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2022 05:00 AM2022-04-02T05:00:00+5:302022-04-02T05:00:09+5:30
कार्यालयीन दिवसांत भोजन अवकाशाचा वेळ वगळता सकाळी १० ते सायंकाळी ६.३० या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयालयाचे कामकाज चालते. जिल्हाधिकारी कार्यालयातील थंड पाण्याच्या कॅन बंद करण्यात आल्याने जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी आपआपल्या घरून बाटलीत पिण्याचे थंड पाणी आणतात. पण, जीवाची काहिली करणाऱ्या उन्हामुळे अल्पावधीतच हे थंड पाणी गरम होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : मागील काही दिवसांपासून जिल्ह्याचे तापमान दिवसेंदिवस वाढत आहे. अशातच उष्माघात टाळण्यासाठी वारंवार भरपूर पाणी पिण्यासह काही मार्गदर्शक सूचना
जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना देण्यात आल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात विविध कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे काय? याबाबत ‘लोकमत’ने रिॲलिटी चेक केली असता जीवाची काहिली करणाऱ्या उन्हाच्या दिवसांतच जिल्हा कचेरीत घुटभर थंड पाणी नागरिकांना मिळत नसल्याचे दिसून आले.
कर्मचारी घरून शिशीत आणतात पिण्याचे पाणी
- कार्यालयीन दिवसांत भोजन अवकाशाचा वेळ वगळता सकाळी १० ते सायंकाळी ६.३० या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयालयाचे कामकाज चालते. जिल्हाधिकारी कार्यालयातील थंड पाण्याच्या कॅन बंद करण्यात आल्याने जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी आपआपल्या घरून बाटलीत पिण्याचे थंड पाणी आणतात. पण, जीवाची काहिली करणाऱ्या उन्हामुळे अल्पावधीतच हे थंड पाणी गरम होते. परिणामी, नाइलाजाने या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना उन्हाळ्याच्या दिवसांत घशाला कोरड पडल्यावर गरम पाणीच प्यावे लागत आहे.
स्वच्छतागृहाशेजारील वॉटर कूलर ठरतोय शोभेची वस्तू
- जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीत जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांच्या दालनाच्या बाजूला एक वॉटर कूलर आहे. या वॉटर कूलरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या छतावर असलेल्या टाकीतील पाणी येते. हे वॉटर कूलर सुरू असले तरी पाणी थंड होत नाही. इतकेच नव्हेतर, हे वॉटर कूलर महिला आणि पुरुषांसाठी असलेल्या स्वच्छतागृहाच्या शेजारीच असल्याने अनेक व्यक्ती या वॉटर कूलरमधील पाण्याचा वापर हात धुण्यासाठी करीत असल्याने हे पाणी कसे प्यावे, असा विचार करतात.
कुंडीतील रोपटेही करपले
- जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी यांच्या दालनासमोर कुंड्यांमध्ये विविध प्रजातीची झाडे लावली आहे. पण जिल्हाधिकारी यांच्या स्वीयसहाय्यक यांच्या दालनाच्या शेजारील स्वच्छतागृहा जवळील कुंडीतील रोपटेच पाण्याअभावी करपल्याचे वास्तव आहे. तर याच भागात काहींनी खर्रा व पान थुंकून भिंतीच रंगविल्या आहेत.
तोंड दाबून बुक्क्यांचा मार?
- जिल्हाधिकारी कार्यालयातील थंड पाण्याच्या कॅन बंद करण्यात आल्याने सध्या येथील कर्मचाऱ्यांना जीवाची काहिली होणाऱ्या उन्हाळ्याच्या दिवसांत गरम पाणीच प्यावे लागत आहे. अधिकाऱ्यांचे हे धोरण तोंड दाबून बुक्क्यांचा मारच, अशी चर्चा सध्या कर्मचाऱ्यांमध्ये रंगत आहे.
पाण्यासाठी वृद्धांना चढाव्या लागतात पायऱ्या
- जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारातीत जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील व उपविभागीय महसूल अधिकारी कार्यालय आहे. तहसील व उपविभागीय महसूल अधिकारी कार्यालयात विविध कामानिमित्त येणाऱ्या निराधार व वृद्धांना घशाला कोरड पडल्यावर ग्लासभर पाण्यासाठी पायऱ्या चढत पहिल्या मजल्यावर जावे लागते. पण, स्वच्छतागृहाशेजारील वॉटर कूलरमधील पाणीच थंड होत नसल्याने गरम पाणी पिऊनच या व्यक्तींना आपली तृष्णातृप्ती करावी लागत आहे.
वयोवृद्ध मोडताहेत बोटे
- जिल्हाधिकारी कार्यालयात विविध कामानिमित्त दररोज शेकडो नागरिक येतात. यात वयोवृद्धांसह महिलांचाही समावेश असतो. घशाला कोरड पडल्यावर वयोवृद्धांसह महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. तर अनेकांना जिल्हा खनिकर्म अधिकारी कार्यालयाशेजारील वॉटर कूलरमधील गरम पाणी सेवन करून अधिकाऱ्यांच्या नावाने बोटे मोडत तृष्णातृप्ती करावी लागत आहे.