पंतप्रधान आवासकरिता पालिकेत नागरिकांची झुंबड
By Admin | Published: June 30, 2016 02:11 AM2016-06-30T02:11:22+5:302016-06-30T02:11:22+5:30
शहरातील गरजवंतांना घर देण्याकरिता शासनाच्यावतीने प्रधापमंत्री आवास योजना राबविण्यात येत आहे.
पालिकेतून सात हजार अर्जांची विक्री
वर्धा : शहरातील गरजवंतांना घर देण्याकरिता शासनाच्यावतीने प्रधापमंत्री आवास योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेण्याकरिता पालिकेत नागरिकांची चांगलीच झुंबड उडत आहे. या योजनेचे बुधवारपर्यंत एकूण सात हजार अर्जांची विक्री झाल्याचे सांगण्यात आले आहे. यातील दोन हजार ५०० नागरिकांनी आवश्यक कागदपत्रासह पालिकेत अर्ज सादर केले आहेत.
ही योजना राबविण्याकरिता पालिकेच्यावतीने योजनेची मुदत वाढवून दिली आहे. पूर्वी ३० जून असलेली मुदत आता १५ जुलै करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ शहरातील सर्वच गरजवंताना मिळावा याकरिता पालिकेच्या सर्वसाधारण सभेत हा निर्णय घेण्यात आल्याचे पालिकेच्यावतीने सांगण्यात आले आहे.
कागदपत्रांची अट शिथिल
वर्धा : आवास योजनेचा लाभ घेताना आवश्यक कागदपत्र गोळा करण्याकरिता नागरिकांना अनेक अडचणी होत होत्या. त्या कमी करण्याकरिता काही आवश्यक कागदपत्रांची पर्यायी व्यवस्था म्हणून इतर कागदपत्र सादर करण्याची मुभा देण्यात आली आहे.
यात घरमालकाकडून भाड्याने राहत असल्याचे लिहून आणण्याची अट रद्द करण्यात आली. यामुळे अनेकांना घर मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. मिळकत प्रमाणपत्राच्या जागी बँकेचे पासबूक व शिधापत्रिकेच्या जागी मतदार ओळख पत्र देण्याची सुविधा वर्धा पालिकेच्यावतीने करण्यात आल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे. यामळे वर्धेतील गरजवंतांना या योजनेचा लाभ घेणे कठीण होत नसल्याचे दिसून आले आहे.(प्रतिनिधी)