कृत्रिम पाणीटंचाईमुळे नागरिकांची होरपळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2020 05:00 AM2020-05-08T05:00:00+5:302020-05-08T05:00:25+5:30
शहरातील संजयनगर झोपडपट्टी भागात किमान दोनशे घरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. शहरात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा केला जातो. आर्वी येथे ब्रिटिशकालीन सारंगपुरी जलाशय आहे. १९१६ पासून याच जलाशयातील पाणी २००६ पर्यंत आर्वीकरांना ओल्ड टाउन शाळा आणि दाऊतपूर येथील जलकुंभांतून पाणीपुरवठा होत होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
देऊरवाडा/आर्वी : शहरात प्रखर उष्णतामानासोबतच नागरिकांना कृत्रिम पाणीटंचाईचे चटके सहन करावे लागत आहेत. तब्बल २०० कुटुंबे पाण्याविना तहानलेली आहे. परिणामी, १५ ते २० दिवसांपासून पालिकेद्वारे नागरिकांना टॅकरने पाणीपुरवठा केला जात असल्याचे चित्र आहे.
शहरातील संजयनगर झोपडपट्टी भागात किमान दोनशे घरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. शहरात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा केला जातो. आर्वी येथे ब्रिटिशकालीन सारंगपुरी जलाशय आहे. १९१६ पासून याच जलाशयातील पाणी २००६ पर्यंत आर्वीकरांना ओल्ड टाउन शाळा आणि दाऊतपूर येथील जलकुंभांतून पाणीपुरवठा होत होता. त्यानंतर जीवन प्राधिकरणाला नगरपालिकेने नळ पुरवठा योजना हस्तांतरित केली. तेव्हापासून देऊरवाडा-वर्धा नदीवरून जीवन प्राधिकरण जलवाहिनीद्वारे शहराला पाणीपुरवठा करीत आहे. मात्र, या विभागाच्या दुर्लक्षित धोरणामुळे काही भागात पाणीपुरवठा होत नाही. काही भागात वारंवार जलवाहिनी नादुरुस्त होते.
संजयनगर परिसरात या जलवाहिनीचे पाणी पोहोचत नाही. त्यामुळे जवळपास दोनशे घरांची पाण्याविना होरपळ होत आहे. याबाबत वारंवार माहिती देऊनही दुर्लक्ष केले जात असल्याची नागरिकांची ओरड आहे.
पालिकेच्या मालकीच्या टँकरने एक दिवसाआड संजयनगरच्या जवळपास दोनशे घरांना पाणीपुरवठा केला जातो. कधी-कधी दोन-तीन फेऱ्या घालाव्या लागतात. पाण्यासाठी गर्दी होऊ दिली जात नाही. सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जात आहे. कन्नमवारनगर येथे पाणी टँकरने पोहोचविले जात आहे.
- गजानन वानखडे, टँकर चालक, नगरपालिका, आर्वी.