पाणीटंचाईने नागरिक हैराण
By Admin | Published: March 17, 2017 01:58 AM2017-03-17T01:58:30+5:302017-03-17T01:58:30+5:30
जिल्ह्यात पाणीटंचाईने चांगलेच डोके वर काढले आहे. ही टंचाई निवारण्याकरिता जिल्हा प्रशासनाच्यावतीने आराखडा तयार करण्यात आला आहे.
उपाययोजना कागदावरच : पारोधीत भटकंती, वर्धेत पाईप पडले पण नळजोडण्या नाही
वर्धा : जिल्ह्यात पाणीटंचाईने चांगलेच डोके वर काढले आहे. ही टंचाई निवारण्याकरिता जिल्हा प्रशासनाच्यावतीने आराखडा तयार करण्यात आला आहे. यात पाणीटंचाई निवारणार्थ कोट्यवधी रुपयांचा खर्च दर्शविला आहे. असे असताना उग्र होत असलेल्या पाणीटंचाईवर उपाययोजना होताना दिसत नाही.
समुद्रपूर तालुक्यात पारोधी या गावात पाणी चांगलेच पेटले आहे. येथे पाण्याकरिता महिलांवर मोर्चा काढण्याची वेळ आली आहे. तर वर्धा शहरातील पुलफैल भागातील नागरिकांची पाण्याकरिता भटकंती होत आहे. या भागात पालिकेच्यावतीने नळयोजनेचे पाईप टाकण्यात आले आहे. मात्र पालिकेत नळजोडणीकरिता कुठल्या नागरिकाकडून अर्ज आला नसल्याने येथे एकाही घरी नळजोडणी देण्यात आली नसल्याची माहिती आहे. तर पालिकेच्यावतीने येथे एखादा सार्वजनिक नळ देणे गरजेचे असताना तोही देण्यात आला नसल्याने नागरिकांना पाण्याकरिता भटकंती करावी लागत आहे.(प्रतिनिधी)
पाईपलाईन असताना नळ नाही; पालिकेकडून निदान सार्वजनिक नळ देण्याची गरज
वर्धेतील पुलफैल परिसरातील नागरिकांना पाण्याकरिता भटकंती करावी लागत आहे. या भागातील नागरिकांना पाणी मिळावे याकरिता पालिका प्रशासनाच्यावतीने नळयोजनेच्या माध्यमातून पाईपलाईन टाकण्यात आली आहे. मात्र या भागातील एकाही नागरिकाडून नळजोडणीकरिता अर्ज आला नाही. परिणामी नळ योजना कार्यान्वीत करून येथे कोणताही लाभ होत नसल्याचे दिसत आहे. यामुळे या भागातील नागरिकांना पाण्याकरिता या परिसरात असलेल्या हातपंपावरच अवलंबून राहावे लागत आहे. एकाच हातपंपावर सतत पाण्याचा उपसा होत असल्याने हा हातपंप आणखी किती दिवस साथ देईल, याचा कुठलाही नेम नाही. यामुळे येत्या दिवसात येथे पाणी टंचाई आणखी तिव्र होण्याचे संकेत मिळत आहे. यामुळे पालिकेच्यावतीने या भागात वेळीच उपाययोजना आखण्याची गरज निर्माण झाली आहे. उन्हाळ्याच्या दिवसात नागरिकांची समस्या मार्गी काढण्याची मागणी आहे.
पारोधीत पाणीटंचाई तीव्र; मार्ग काढण्याची मागणी
समुद्रपूर- तालुक्यातील पारोधी गावातील पाणीटंचाईवर आंदोलनानंतर कुठलाही तोडगा काढण्यात आला नाही. परिणामी, पाण्याकरिता महिलांच्या होणाऱ्या भटकंतीने असंतोष पसरला आहे. दिवसागणिक उन्हाची तीव्रता वाढत असल्याने गावात तणावपूर्ण शांतता आहे.
येत्या चार दिवसात पाणीटंचाईवर कायमस्वरूपी मार्ग निघाला नाही तर येथील महिला जिल्हाधिकारी कार्यालयावर मुलेबाळे घेवून आंदोलन करणार असा इशारा दिला आहे. गत १५ दिवसांपूर्वी पारोधी येथे पाणीटंचाई निवारणार्थ नवा बोर खोदण्याबाबत महिलांनी तहसील कार्यालय, पंचायत समिती आणि समुद्रपूर पोलीस ठाण्यात मोर्चा नेला होता. त्यानंतर लोकशाही दिनी महिलांनी पुन्हा धडक दिल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी या गावात जात पाणीटंचाई निवारण्याच्या सूचना केल्या. यावरून तहसीलदार दीपक करंडे, बीडीओ विजय लोंढे यांनी गावात जात पाहणी केली. यावेळी त्यांनी गावात असलेली बोरची समस्या मार्गी काढण्याऐवजी विहीर अधिग्रहणाबाबत चर्चा करून ते परत आले. अद्याप येथील पाणी समस्या मार्गी निघाली नाही.
यामुळे गावातील पाणी समस्या ताबडतोब सोडवावी याकरिता पारोधी येथील विद्या मेंढे, मीरा झाडे, प्रतिभा तांदुळकर, भारती लोणारे, छबुबाई आडकिने, रंजना कांबळे, शालू डंभारे, कमला अबलनकर, रमा ढाकणे, शीतल शेळकी इत्यादी महिलांनी पाणीटंचाई समस्या त्वरीत सोडवावी असी मागणी केली आहे. याकडे दुर्लक्ष झाल्यास महिलांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठत आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.(तालुका प्रतिनिधी)