नागरिकांनी महाश्रमदान करून दुष्काळाशी केले दोन-दोन हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2018 12:08 AM2018-05-05T00:08:14+5:302018-05-05T00:08:14+5:30
किन्हाळा (जसापूर) या गावाने पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत भाग घेतला आहे. तेथे दुष्काळाशी दोन-दोन हात करण्यासाठी व गाव शिवाराला पाणीदार बनविण्यासाठी महाश्रमदानाचे आयोजन करण्यात आले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्वी : किन्हाळा (जसापूर) या गावाने पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत भाग घेतला आहे. तेथे दुष्काळाशी दोन-दोन हात करण्यासाठी व गाव शिवाराला पाणीदार बनविण्यासाठी महाश्रमदानाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात ग्रामस्थांसह परिसरातील महिला-पुरुष व चिमुकले सहभागी झाले होते.
या उपक्रमादरम्यान माजी आमदार दादाराव केचे यांनी किन्हाळा जसापूर येथे जावून हातात कुदळ व फावडे घेऊन प्रत्यक्ष श्रमदान केले. गत वर्षी प्रमाणे याही वर्षी वॉटर कप आर्वी विधानसभा क्षेत्रातील गावाला मिळावा यासाठी भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनीही यावेळी श्रमदान केले.
वॉटर कप स्पर्धेचे यंदाचे हे तिसरे वर्ष असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पर्धेच्या निमित्ताने प्रत्येक गाव एकसंघ होत असल्याचे बघावयास मिळत असल्याचे म्हटले होते. ते येथे तंतोतंत खरे होत आहे. यंदा या स्पर्धेत तब्बल ७५ तालुक्यांनी सहभाग घेतला आहे. गत वर्षी राज्यात प्रथम क्रमांक आर्वी तालुक्यातील काकडदरा या गावाने पटकाविल्याने कप तालुक्यातच टिकवून ठेवण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने श्रमदानाच्या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन मनोगत व्यक्त करताना माजी आमदार दादाराव केचे यांनी केले. वॉटर कप स्पर्धेतील पहिल्या तीन विजेत्यांना गावांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. शिवाय रोख पुरस्कारही मिळणार आहे, असेही यावेळी सांगण्यात आले.
किन्हाळा येथील विशेष उपक्रमात माजी आमदार दादाराव केचे यांच्यासह कारंजा पं.स.चे सभापती मंगेश खवशी, जि.प. सदस्य भाऊ खवशी, जि. प. अंकीता होले, किन्हाळाच्या सरपंच शालू दहीवडे, जसापूरचे सरपंच भोजराज बननगरे, अजय कट्टमवार, ग्रामसेवक कांबळे, हजारे, रावळे, हेमराज देवासे, नंदु पठाडे, अमोल आजनकर, सिता बैगने, सुरेखा कांबळे, कृषी सहायक इंगोले, सुरेखा हिराळे, रामचंद्र पठाडे यांच्यासह परिसरातील महिला-पुरुष, तरुण-तरुणी तसेच विद्याथ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन प्रत्यक्ष श्रमदान केले. श्रमदानाच्या माध्यमातून किन्हाळा (ज.) येथे जलसंवर्धनाची बरीच कामे करण्यात आली.