नागरिकांना काढावा लागतो खड्डे व चिखलातून मार्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 10:34 PM2018-08-30T22:34:47+5:302018-08-30T22:35:16+5:30
गणेशनगरपासून वर्धा-हिंगणघाट मार्गाला जोडणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. जागोजागी खड्डे पडले आहे. हाच गणेशनगरच्या रहिवाशांना ये-जा करण्याचा मुख्य रस्ता असल्याने या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी या रस्त्यावरील खड्ड्यात झाडे लावून समता सैनिक दलाच्यावतीने प्रशासनाचा निषेध करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : गणेशनगरपासून वर्धा-हिंगणघाट मार्गाला जोडणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. जागोजागी खड्डे पडले आहे. हाच गणेशनगरच्या रहिवाशांना ये-जा करण्याचा मुख्य रस्ता असल्याने या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी या रस्त्यावरील खड्ड्यात झाडे लावून समता सैनिक दलाच्यावतीने प्रशासनाचा निषेध करण्यात आला.
गणेशनगरच्या नागरिकांना जाण्याकरिता वर्धा-हिंगणघाट मार्गास जोडणारा हा एकमेव रस्ता आहे. या रस्त्याच्या एका बाजूला गोल्डन किड्स कॉन्व्हेंट तर दुसºया बाजूला महाकालीचे मंदिर आहे. या रस्त्याने विद्यार्थी, बालक, पालक आणि भाविकांची नेहमी गर्दी असते. वर्धा-हिंगणघाट या मार्गाला जोडणारा हा मुख्य रस्ता असल्यामुळे दुचाकी व चारचाकी वाहणाचीही नेहमीच वर्दळ असते. त्यामुळे या भागात राहणाºया नागरिकांना त्यांच्या घरी जाण्याकरिता पाणी साचलेल्या खड्ड्यातून मार्ग काढावा लागत असल्याने त्यांना चांगलीच कसरत करावी लागते. रस्त्याने अनेकदा किरकोळ अपघात सुध्दा झाले आहेत. त्यामुळे नागरिक मनात अपघाताची भिती घेऊन या मार्गे ये-जा करीत असतात. रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात यावे. या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी समता सैनिक दलाच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित येत खड्ड्यात झाडे लावली. नगर प्रशासन व लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देत डागडूजी करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. अन्यथा समता सैनिक दल व नागरिकांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. आंदोलनाला समता सैनिक दलाचे विदर्भ प्रदेश मार्गदर्शक अभय कुंभारे, भारीप बहुजन महासंघाचे शहर संघटक गौतम देशभ्रतार, विकास मून, मोहन मेश्राम, विजय वानखेडे, वसंता हातमोडे, शामराव डहाके, प्रदीप भगत, जयंत गोडघाटे, दादाराव सेलकर आदीसह नागरिक उपस्थित होते.
पालिकेची हद्द समस्याग्रस्त
गोल्डन किड्स कॉन्व्हेंट ते मुख्य रस्त्यापर्यंतचा भाग हा नगर परिषदेच्या हद्दीत येत असून पावसाच्या दिवसात गणेश नगरातील या भागात रस्त्याची समस्या डोके वर काढत असते. याची माहिती नगर परिषद प्रशासनाला असून त्यांच्याकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप गणेश नगर भागातील नागरिकांचा आहे.