नागरिकांची इलेक्ट्रिक वाहनांना पसंती पण वाहन मधेच बंद पडले तर दुरुस्त कोण करणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2025 18:32 IST2025-04-18T18:31:51+5:302025-04-18T18:32:46+5:30

नागरिकांपुढे अडचणींचा डोंगर कायम : चार वर्षांत ४ हजार १८० ई-वाहनांची खरेदी पण चार्जिंग स्टेशनची सुविधाच नाही !

Citizens prefer electric vehicles, but if the vehicle breaks down in the middle of the journey, who will repair it? | नागरिकांची इलेक्ट्रिक वाहनांना पसंती पण वाहन मधेच बंद पडले तर दुरुस्त कोण करणार?

Citizens prefer electric vehicles, but if the vehicle breaks down in the middle of the journey, who will repair it?

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा :
बदलत्या वेळेसोबत इंधनालाही पर्याय आल्याने इलेक्ट्रिक वाहने खरेदी करणे पसंतीचे ठरत आहे. मात्र, हेच इलेक्ट्रिक वाहन बंद पडले, तर दुरुस्त कोण करणार? तसेच चार्जिंग कुठे करणार? असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित होत आहे. 


वर्षभरामध्ये जिल्हाभरात ९२२ इलेक्ट्रिक वाहनांची विक्री झाली. याची उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या लेखी नोंदणीही करण्यात आली आहे. यामध्ये इलेक्ट्रिक स्कूटरची संख्या ६६१ इतकी आहे तर चारचाकी वाहनांची संख्या २० इतकी आहे. यात सर्वांत जास्त दुचाकींचा समावेश आहे. दुचाकींमध्ये बिघाड झाल्यास सर्व्हिस सेंटरमध्ये त्याची दुरुस्ती केली जाते. मात्र, इलेक्ट्रिक वाहन दुरुस्त करणाऱ्यांची संख्या नगण्यच आहे. त्यामुळे वाहनधारकांमध्येही चुकीचा संदेश जाऊ नये, याचीही काळजी घेणे आवश्यक असून त्याच्या दुरुस्तीची सुविधाही बाजारपेठेत उपलब्ध होण्याची गरज आहे. जिल्ह्यातील इलेक्ट्रिक वाहनांची आकडेवारी लक्षात घेतली असता चारचाकी वाहनाला फारशी मागणी नसल्याचेच दिसून येत आहे. त्याचे कारण म्हणजे जिल्हाभरात कोठेही इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशनची सुविधा नाही. आता काही दिवसांतच एसटीमध्येही इलेक्ट्रिक बसेस दाखल होणार आहेत. यासाठी आर्वी आणि वर्धा आगारात चार्जिंग स्टेशनचे कामही सुरू झाले असल्याचे बोलले जात आहे.


जिल्ह्यात या वाहनांचे मेकॅनिक किती?
इलेक्ट्रिक वाहन बंद पडले तर दुरुस्तीला कुणाकडे न्यायचे, असा प्रश्न वाहनचालकासमोर उपस्थित होतो. इलेक्ट्रिक वाहन दुरुस्ती करणारे मेकॅनिक बोटावर मोजण्याइतकेतच आहेत. इलेक्ट्रिक वाहनांची विक्री वाढत असली तरी दुरुस्ती करणाऱ्या मेकॅनिकची संख्या वाढणेही गरजेचे झाले आहे.


आयटीआयमध्ये कधी शिकवणार काम ?
इलेक्ट्रिक वाहनांची विक्री वाढत असताना, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत या विषयाचा अंतर्भाव करणे अत्यंत गरजेचे आहे. आधीच्या वाहनांचा अभ्यास व्हीसीएमसीमध्ये शिकविला जात होता, हे येथे उल्लेखनीय. मात्र, इलेक्ट्रिक वाहनांचा त्यात समावेशच नव्हता. याचे प्रशिक्षण देण्याची गरज असल्याचेही बोलले जात आहे.


उन्हाळ्यात वाहने पेटण्याच्या समस्या वाढल्या
इलेक्ट्रिक वाहनांची आज मोठ्या प्रमाणात खरेदी केली जात आहे. परंतु, कमी दर्जाची असलेली वाहने अधिक तापमानामुळे पेट घेत असल्याच्या घटनाही घडत आहेत. जिल्ह्याचे उन्हाळ्यात तापमान ४५ च्यावर जाण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत ही वाहने धोकादायक ठरण्याचीही शक्यता वर्तविली जाते.


मेकॅनिकना प्रशिक्षण देण्याची गरज
इलेक्ट्रिक वाहन बिघडल्यास एक तरी मेकॅनिक शोधण्याची गरज भासते. सद्यःस्थितीत इलेक्ट्रिक वाहन दुरुस्त करणाऱ्या मेकॅनिकला प्रशिक्षण देण्याची नितांत गरज निर्माण झाली असून, त्याचा फायदा होईल. या मेकॅनिकना प्रशिक्षण मिळाल्यास कोणत्याही दुकानात याची दुरुस्ती करता येईल. परिणामी वाहनाचाही वापर वाढू शकतो. त्यामुळे प्रशासनाने याकडे देखील लक्ष देण्याची नितांत गरज आहे.


४ हजार वाहनांची नोंदणी. मात्र, चार्जिंग स्टेशनचा अभाव
जिल्ह्यात ४ हजार इलेक्ट्रिक वाहने धावत आहेत. परंतु, शहरातच काय जिल्हाभरात कोठेही चार्जिंग स्टेशन उपलब्ध नसल्याने या चारचाकी चालकांना वाहने घरीच चार्ज करावी लागत आहेत.


"शहरात अनेक इलेक्ट्रिक वाहने धावत आहेत. परंतु, आमच्याकडे याच्या दुरुस्तीचे प्रशिक्षण नसल्याने, वाहने हाताळत नाही. शोरूम चालकांना याचे प्रशिक्षण देण्याची मागणी केली होती. परंतु, आमच्या शोरूममध्ये दुरुस्त होतील, अशी प्रतिक्रिया दिली. चालक वाहनाला धक्का मारत घेऊन जाताना दिसून येतात."
- कृणाल बिलवणे, मेकॅनिक

Web Title: Citizens prefer electric vehicles, but if the vehicle breaks down in the middle of the journey, who will repair it?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.